esakal | म्यानमारच्या नागरिकांनी घेतले "संस्कार भारती'च्या व्हर्च्युअल कार्यशाळेतून भारतीय रांगोळीचे धडे !
sakal

बोलून बातमी शोधा

Rangoli

स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, यंगून, म्यानमारतर्फे अनेक विविध उपक्रम राबवले जात आहेत. अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन कला असलेल्या रांगोळीवर कार्यशाळा आयोजित करण्याची कल्पना केंद्र संचालिका डॉ. आसावरी बापट यांच्या मनात आली. त्यासाठी रांगोळी या कला क्षेत्रात फार मोठे योगदान असलेल्या संस्कार भारतीच्या सहकार्याने ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

म्यानमारच्या नागरिकांनी घेतले "संस्कार भारती'च्या व्हर्च्युअल कार्यशाळेतून भारतीय रांगोळीचे धडे !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : संकटांनी डगमगून जाण्यापेक्षा संकटांवर मात करण्यातच खरी कसोटी असते. "कोव्हिड 19'च्या जागतिक महामारीच्या अडचणीवर मात करत जग पुढे चालले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या सामाजिक विलगीकरणाच्या काळातही स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, यंगून, म्यानमारतर्फे अनेक विविध उपक्रम राबवले जात आहेत. अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन कला असलेल्या रांगोळीवर कार्यशाळा आयोजित करण्याची कल्पना केंद्र संचालिका डॉ. आसावरी बापट यांच्या मनात आली. त्यासाठी रांगोळी या कला क्षेत्रात फार मोठे योगदान असलेल्या संस्कार भारतीच्या सहकार्याने ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

7 ते 10 नोव्हेंबर अशी चार दिवस ही कार्यशाळा स्वामी विवेकानंद सांस्कृतिक कंद्र, यंगून, म्यानमार व भारतीय दूतावासातर्फे आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या प्रारंभी सर्वांचे स्वागत व कार्यशाळेची रूपरेखा डॉ. आसावरी बापट यांनी मांडली. त्यानंतर संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अमीरचंद यांनी संस्कार भारतीच्या कार्याची थोडक्‍यात ओळख करून दिली. त्यानंतर संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष, विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांचे मार्गदर्शन लाभले. 

म्यानमारमधील यंगून (रंगून), जियावाडी, चौतगा, लाशो, सिटवे, मांडले, झगाईन, पी ऊ ल्वे, म्योमे अशा विविध भागांतून लोकांचा उत्साही सहभाग होता. या वर्गात प्रशिक्षक रघुराज देशपांडे (सोलापूर, सध्या केंद्र पुणे) आणि अभय दाते यांनी बिंदू, रेषा, शंख, कलश, स्वस्तिक, सूर्य, तुरा अशा सांस्कृतिक प्रतीकांचा परियच करून दिला. ऑनलाइन वर्ग असूनही त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देत त्यांच्याकडून उत्तम सराव करून घेतला. 

शेवटच्या दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी समारोपाला संस्कार भारतीचे संस्थापक आणि मार्गदर्शक श्री. योगेंद्र आणि संस्कार भारती केंद्रीय कार्यकारिणी आणि अखिल भारतीय चित्रकला केंद्राचे मार्गदर्शक रवी देव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रारंभी दीड तास ठरलेला हा वर्ग प्रतिदिन दोन तासांपर्यंत चालला. सर्वच प्रशिक्षणार्थींनी या वर्गामुळे मिळालेला आनंद व्यक्त करतानाच पुन्हा पुन्हा या वर्गाचे आयोजन करण्याची विनंती केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल