कुर्डुवाडीत व्यापाऱ्यावर गोळीबार; बुधवारी हल्ल्याच्या निषेधार्थ राहणार किराणा दुकाने बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका प्रतिष्ठित किराणा व्यापाऱ्यावर बंदुकीतून दोन गोळ्या झाडून त्यांच्या हातातील पिशवी पळवून नेली असल्याची घटना कुर्डुवाडीत घडली.

कुर्डुवाडी (सोलापूर) : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका प्रतिष्ठित किराणा व्यापाऱ्यावर बंदुकीतून दोन गोळ्या झाडून त्यांच्या हातातील पिशवी पळवून नेली असल्याची घटना कुर्डुवाडीत घडली. याची माहिती कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी दिली आहे. यामध्ये किराणा व्यापारी जखमी झाला असून कुर्डुवाडी येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेण्यात आले आहे. प्रवीण काशिनाथ ढवळसकर (रा. कुर्डुवाडी), असे त्यांचे नाव आहे. 
घटना टेंभुर्णी रस्त्यालगतच्या परिसरात मंगळवारी (ता. 23) रात्री नऊच्या सुमारास घडली. 
ढवळसकर व त्यांचे भाऊ हे दोघे टेंभुर्णी रस्त्यालगत असलेले दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतत होते. टेंभुर्णी रस्त्यावरून घराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर वळण घेऊन आत जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघे ढवळसकर यांच्याकडील पिशवी हिसकावून घेत दोन गोळ्या झाडून पळून गेले. यामध्ये ढवळसकर हे काखेखाली गोळी लागल्याने जखमी झाले. पिशवीतील पैसे की कागदपत्रे चोरीला गेली, याचा तपशील मात्र समजू शकला नाही. किराणा व्यापारी असोसिएशनचे सचिव अनुप दोशी म्हणाले, किराणा व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी सर्व किराणा दुकाने बंद ठेवणार आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A grocery trader was shot injured in Kurduvadi