बोअरला शंभर टक्के पाणी लागण्याची गॅरंटी नाहीच ! तरी बांधकाम, घरगुतीसाठी शोधला जातोय बोअरचाच पर्याय

Boarwell
Boarwell
Updated on

नातेपुते (सोलापूर) : "माळाचे शीर म्हणजे माळशिरस' अशी आख्यायिका असणाऱ्या माळशिरस तालुक्‍यात नीरा उजवा कालवा, उजनी कालवा यांचे जरी पाणी येत असले तरीही काही गावे, काही जमिनींचे क्षेत्र अशी आहेत की स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांतही या भागात कॅनॉलचे पाणी आलेले नाही. तसेच ज्या गावांमध्ये कॅनॉलचे पाणी येते, परंतु सध्याचे प्रशासन पाहता पूर्वी पंधरा दिवसाला किंवा 21 दिवसाला पाण्याची पाळी येत होती, पण सध्या तीन महिन्यांनंतर ते पाणी शेतीला मिळत आहे, हे लक्षात घेऊन अनेक शेतकरी बागायती पिकांसाठी हक्काचे पाणी मिळविण्यासाठी विहिरींचा, विंधन विहिरींचा पर्याय शोधला आहे व शोधत असतात. 

ज्या ठिकाणी विहिरीत कमी पाणी आहे किंवा अजिबात पाणी नाही, अशा ठिकाणी बोअरवेलशिवाय पर्याय नाही. माळशिरस तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील भांब, रेडे, गिरवी आणि वेळापूरच्या दक्षिणेकडील मळोली, तांदूळवाडी, पिलीव या ठिकाणी आणि त्या परिसरात बोअरवेलला पसंती दिली जात आहे. अकलूज, नातेपुते, माळशिरस, वेळापूर आदी ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये अनेक लोकांनी बांधकाम आणि नित्य वापरासाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी चार इंची बोअरवेल्स मोठ्या प्रमाणात घेतलेली आहेत. 

कोरोना संसर्ग सुरू होण्यापूर्वी माळशिरस तालुक्‍यात कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू या राज्यांतील बोअरवेल्स मशिनचे मालक दरवर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये आपल्या बोअरच्या मशिन घेऊन येतात आणि कमिशन बेसिसवर स्थानिक लोकांना मशिन चालवण्यास देतात. यामागचा उद्देश म्हणजे शंभर टक्के वसुली. शंभर टक्के वसुली करण्यासाठी आणि होण्यासाठी स्थानिक एजंटचा उपयोग चांगल्या प्रकारे होत असतो. 

कोरोना संसर्ग सुरू होण्यापूर्वी पंधरा ते वीस मशिन असत. सध्या फक्त पाच मशिन संपूर्ण तालुक्‍यात आहेत. कोरोना हे जरी कारण असले तरीही मागील दोन वर्षांपासून या परिसरात झालेला चांगला पाऊस हे खरे कारण आहे. त्यामुळे अनेकांनी बोअर घेण्याचे टाळलेले आहे. जुन्या बोअरला जादा पाऊस झाल्यामुळे आपोआप पाण्याचा स्रोत वाढलेला आहे. बंद असणारे बोअर आपोआप सुरू झाले आहेत. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे पूर्वी 65 ते 70 रुपये प्रतिफूट दर होता तो यावर्षी 75 रुपये झालेला आहे. केसिंग पाइपचा दर फुटाला 250 ते 280 रुपये झालेला आहे. 

दरवर्षी 700 ते 800 बोअर ! 
अनेक मशिनला आठवडा -आठवडा काम मिळत नाही. तालुक्‍यातील अकलूज शहरात शेतीपेक्षाही घरगुती उपयोगासाठी बोअर घेतले जातात. ते तीनशे फुटांच्या पुढे जात नाहीत. परंतु माळशिरस, मळोली, पिलीव ते फोंडशिरस आदी भागात सहाशे ते सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात. संपूर्ण तालुक्‍यात वर्षभरात 700 ते 800 बोअर पाडले जात असावेत, असा अंदाज आहे. 

धर्मपुरी, शिंदेवाडी भागात दोनशे ते अडीचशे फुटांपर्यंत चांगले पाणी लागते. नातेपुते परिसरातील अनेक भागात 40 ते 60 फुटांपर्यंत चांगले पाणी लागते. तरीही दोनशे ते अडीचशे फुटांपर्यंत बोअर वापरासाठी पाडले जाते. मात्र शेतीला दोनशेच्या पुढे जावे लागते. साडेतीनशे ते चारशे फुटांपर्यंत शेतकरी बोअर घेतात. लोणंद, फरतडी या भागात कमीत कमी चारशे फुटांपर्यंत आणि जास्तीत जास्त 600 फुटांपर्यंत बोअर पाडले जाते. पिरळे भागात 300 फूट. 

तालुक्‍यातील अनेक भागांमध्ये तीस फुटांपर्यंत खडक लागतो नंतर 50 फुटांपर्यंत तांबडी माती लागते. नंतर 50 फुटांपासून काळा पाषाण शेवटपर्यंत लागत असतो. बोअर घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे; कारण पाणी लागण्याची शक्‍यता मावळत चाललेली आहे. अनेक गावांत आणि शहरांमधून सार्वजनिक पाणी वितरण व्यवस्था चांगली होत आहे. 

ज्या ठिकाणी कॅनॉलचे पाणी येत नाही, पाणी कुठे लागेल यासाठी शेतकरी पाणाड्यांकडून पाणी शोधत असतो. तो धडपडत असतो. कमीत कमी पन्नास हजार ते जास्तीत जास्त एक लाखापर्यंत बोअर घेण्याचा खर्च होत आहे. मोटार बसवली तरच बोअर घेतल्याचा फायदा होत असतो. स्थानिक लोकांच्या बोअर मशिन फार कमी आहेत. लेबरही परप्रांतीयच आहेत. हा व्यवसाय मार्च, एप्रिल व मे असा तीनच महिने चालत आहे. वर्षानुवर्षे मशिन उभा ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे स्थानिक लोक मशिन घेण्याचे धाडस करत नाहीत. एक बोअर घेण्यास एक लाख रुपये जवळ असतील तरच शेतकरी धाडस करीत असतो. एवढे करूनही पाणी लागण्याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेक लोक मागील दोन वर्षांपासून बोअरवेल घेणे टाळत आहेत. 

पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. आणि गॅरंटेड शंभर टक्के पाणी लागेलच याची शाश्वती नसल्यामुळे लोक अन्य पर्याय शोधत आहेत. अनेक जणांनी शेततळ्याला प्राधान्य दिलेले आहे. शेततळ्यासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान देणे गरजेचे आहे. तरच बोअरवेल पाडण्यासाठी होणारी धडपड शेतकरी 
थांबवतील, असे वाटते. 

पूर्वी शंभर टक्के एक ते दीड इंच पाणी लागत होते. आता शंभर टक्के पाणी लागेलच याची खात्री देता येत नाही. पाण्याचा उपसा खूप वाढला आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. त्यामुळे पाणी दाखवण्यासाठी मनाची तयारी होत नाही. 
- बाबा भिवा बरडकर,
नातेपुते 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com