पालकमंत्री भरणे म्हणाले, पुढच्या महिन्यात कोरोनाच्या मोठ्या लाटेची शक्‍यता 

प्रमोद बोडके
Friday, 30 October 2020

कोरोनाची लस उपलब्ध झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना सर्वप्रथम ही लस उपलब्ध व्हावी यासाठी मी स्वतः सरकारकडे पाठपुरावा करेल असा विश्वासही पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यावेळी व्यक्त केला. लस मिळणार आहे म्हणून नागरिकांनी गाफिल राहू नये असे आवाहनही त्यांनी केले.  

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता कमी होत आली आहे. पुढील महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येईल, ही लाट पूर्वी पेक्षाही मोठी असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अद्यापही संकट पूर्णपणे संपलेले नाही. कोरोना संपला म्हणून गाफील राहू नका, कोरोना पासून बचाव करण्यासाठी काळजी घ्या असा सल्ला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिला. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा दावाही पालकमंत्री भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींचे सोलापूर जिल्ह्यातील प्रमाण आजही जास्त आहे. शहर व जिल्ह्यातील ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अशा रुग्णालयांची यादी करुन त्या रुग्णालयातील डॉक्‍टरांसाठी तज्ज्ञांचा परिसंवाद तत्काळ आयोजित करा. 

पालकमंत्री म्हणाले, फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून अचानक एकाच दिवशी फ्रान्समध्ये पन्नास हजार रुग्ण सापडले आहेत. जर्मनीचीही तशीच स्थिती असून जर्मनीमध्ये एकाच दिवशी 14 हजार रुग्ण आढळले आहेत. इटलीमध्ये एकाच दिवशी 20 ते 25 हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. इतर देशातील ही परिस्थिती पाहता आपल्याकडेही कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही पालकमंत्री भरणे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Guardian minister bharne said the possibility of a big wave of corona next month