पालकमंत्री भरणे : बाहेरच्या 30 टक्के कोरोनाबाधितांवर सोलापुरात उपचार

प्रमोद बोडके
Friday, 4 September 2020

  • पालकमंत्री भरणे म्हणाले... 
  •  सिव्हिलमध्ये शंभर बेडचा आणखी एक कक्ष सुरु करा 
  • सोलापूरच्या प्रश्‍नांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक 
  • जलवाहिनी, स्मार्ट सिटीच्या कामांवर देणार विशेष लक्ष 
  • विकासाच्या कामात पक्षिय भेदभाव नाही 
  • ग्रामीण भागात अँटीजेनच्या 70 हजारांहून अधिक टेस्ट 
  • सोलापुरात अँटीजेनच्या 42 हजारहून अधिक टेस्ट 

सोलापूर : सोलापूर शहर, बार्शी, पंढरपूर, अकलूज येथे कोरोनाबाधितांवर चांगल्या पध्दतीने उपचार होत असल्याने शेजारच्या राज्यातील व जिल्ह्यातील जवळपास तीस टक्के रुग्ण सोलापूर शहर व जिल्ह्यात उपचारासाठी येऊ लागले आहेत. बाहेरचे रुग्ण वाढल्याने आणि बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या ऑक्‍सिजनचे नियमन झाले आहे. सोलापुरातील रुग्णालयांना आवश्‍यक तेवढे ऑक्‍सिजन देण्याचे नियोजन केल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

रुग्ण कोणत्याही भागातील असो तो आपल्याकडे आल्यानंतर त्याच्या उपचाराच्याबाबतीत भेदभाव करता येणार नाही. सर्वांवर उपचार केले जातील. इतर राज्यातून येणाऱ्या ऑक्‍सिजनचे नियमन झाले असले तरीही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून सोलापूरला ऑक्‍सिजन उपलब्ध करुन दिले जात आहे. या शिवाय टेंभुर्णी येथील ऑक्‍सिजन निर्मितीची कंपनीही सुरु करण्यात आली आहे. सोलापुरात तयार होणारा ऑक्‍सिजन फक्त वैद्यकीय सुविधेसाठीच वापरण्याचे निर्देश दिले आहेत. सोलापुरातून बाहेर ऑक्‍सिजन पाठविण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली. ग्रामीण भागात टेस्टिंगचे प्रमाण वाढल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या जशी आटोक्‍यात आली तशीच ग्रामीण भागातीलही रुग्ण संख्या आटोक्‍यात येईल. 

पालकमंत्री भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते. औषधे आणि इतर अनुषांगिक साहित्याची मागणी अगोदरच करा अशा सूचना सहाय्यक अधिष्ठाता डॉ.शुभलक्ष्मी जयस्वाल आणि डॉ.अग्रजा वरेरकर-चिटणीस यांना दिल्या. महिला आणि मुलांसाठीच्या रुग्णालयाचे कामकाज गतीने करण्यात यावे, त्यासाठी आवश्‍यक निधी मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister bharne : Treatment in Solapur on 30 per cent corona sufferers from outside