दोन दिवसांत केला जाईल बिबट्याचा बंदोबस्त : पालकमंत्री दत्तात्रय भरणे 

Bharane
Bharane

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात बिबट्याने तीन बळी घेतले आहेत, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या बिबट्याची धास्ती संपूर्ण तालुक्‍याने घेतली आहे. मात्र कुणीही घाबरू नये, वेळप्रसंगी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग केला जाईल. येत्या दोन दिवसांत या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 

अंजनडोह (ता. करमाळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या जयश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी आज (शुक्रवारी) सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंजनडोह येथे आयोजित अधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. 

या वेळी मृत जयश्री शिंदे यांचे पती दयानंद शिंदे व त्यांच्या तीन मुलांशी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे यांनी संवाद साधला. आमदार संजय शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी ज्योती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, वनविभागाचे धनंजय पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पडळकर, सभापती गहिनीनाथ ननवरे, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, बिभीषण आवटे, उपसभापती दत्ता सरडे, तानाजी झोळ, सरपंच विनोद जाधव, माजी सरपंच अरुण शेळके, शिवाजी माने, डॉ. अशोक शेळके, सुभाष बलदोटा, ऍड. राहुल सावंत उपस्थित होते. 

पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले, करमाळा तालुक्‍यात एकापेक्षा जास्त बिबटे असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; मात्र कुणीही घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येकच बिबट्या मनुष्यावर हल्ला करतो असे नाही. माणसावर हल्ला करणारा एकच बिबट्या आहे, या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग, पोलिस विभाग, महसूल आदी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. शासन स्तरावरही सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या बिबट्या वांगी भागात आहे. या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी, शार्प शूटर, ड्रोन पथक तैनात आहेत. दोन दिवसांत या बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल. 

करमाळा तालुक्‍यात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांची मीटिंग घेतलेली आहे. त्या सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. ज्यांना कुणाला बिबट्या दिसेल त्यांनी सर्वप्रथम गाव पातळीवरच्या लोकांना संपर्क करावा. बिबट्याला पकडण्यासाठी व्यस्त असलेल्या वन अधिकाऱ्यांना फोन करून डिस्टर्ब करण्यापेक्षा त्यांना सहकार्य करावे. ज्या भागात बिबट्या जाईल त्या भागात संध्याकाळची वीज बंद करावी. इतर ठिकाणी ती वीज दोन पाळ्यांमध्ये द्यावी, म्हणजे सर्वांना वीज पूर्ण दाबाने मिळेल. 
- संजय शिंदे,
आमदार, करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com