पालकमंत्री भरणे आज सोलापुरात, आषाढीवारी, कोरोनाचा घेणार आढावा

प्रमोद बोडके
Friday, 15 May 2020

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.  पंढरपूरमध्ये होणारा आषाढीवारी सोहळा आणि सोलापुरातील कोरोनाची स्थिती याबाबतचा ते आढावा घेणार आहेत. 

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.  पंढरपूरमध्ये होणारा आषाढीवारी सोहळा आणि सोलापुरातील कोरोनाची स्थिती याबाबतचा ते आढावा घेणार आहेत. 
आषाढी वारी निमित्त दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा सोहळा कसा करायचा? याबाबत वारकरी, राज्य सरकार व जिल्हा प्रशासन यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर शहरात आले असून यंदाच्या आषाढीवारी सोहळा निमित्त ते जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापुरात कोरोनाचे 330 रूग्ण आढळले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. ही संख्या आणखी कशी कमी करता येईल? याबाबतही आज अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 106 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून ते कोरोना मुक्त झाले आहेत. ही सोलापूरसाठी जमेची बाजू आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क व सॅनीटायझरचा वापर करावा,  घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, मधुमेह, रक्तदाब यासह इतर दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींनी या कालावधीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Dattatraya Bharne in Solapur today