मोठी बातमी! 'नगरोत्थान'ला ब्रेक नाहीच; विरोधी पक्षनेते कोठेंच्या मागणीनंतर 'यांनी' दिले उत्तर

Dattatray-Vithoba-Bharne (2) - Copy.jpg
Dattatray-Vithoba-Bharne (2) - Copy.jpg

सोलापूर : शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत 13 कोटी 90 लाख रुपयांची विकास कामे होणार आहेत. या योजनेतील कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून फेब्रुवारी 2020 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. आता त्यातील काही कामांची निवीदाही निघाली परंतु, निधीचे समान वाटप न झाल्याने ही कामे थांबवावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. मात्र, आता ही कामे थांबविणे अशक्‍य असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात सभागृहातील उपसूचनेवर महेश कोठे यांचीच स्वाक्षरी असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेत भाजपचे संख्याबळ 51 आहे. तर शिवसेनेचे 22 नगरसेवक असून कॉंग्रेसचे 14, एमआयएमचे नऊ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, बसपाचे (वंचित बहूजन आघाडी) दोन, कम्युनिष्टचे एक असे संख्याबळ आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता असून राज्य सरकारच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेचा निधी मिळाला आहे. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महापौर, सभागृह नेत्यांनी त्यांच्या नगरसेवकांना विकास कामांसाठी अधिक निधी दिला आहे. तर उर्वरित नगरसवेकांना कमी-अधिक निधी मिळाला आहे. कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिकट झाल्याने खूप महिन्यांनंतर या योजनेतून नगरसेवकांना निधी मिळणार आहे. त्यामुळे मिळेल तेवढा निधी पदरात पाडून घेण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. आता ही स्पर्धा टक्‍केवारी मिळावी म्हणून सुरू आहे की त्यांच्या प्रभागातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आहे, असा प्रश्‍न शहरवासियांना पडला आहे. तत्पूर्वी, आता असमान निधी वाटपावरुन महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर वेळप्रसंगी जनहित याचिका दाखल करण्याचाही इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.


ठळक बाबी...

  • फेब्रुवारी 2020 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नगरोत्थानच्या कामांना प्रशासकीय मान्यता
  • विकास कामांसाठी दोन वर्षांची मुदत; विलंब झाल्यास शिल्लक निधी होणार शासनजमा
  •  पालकमंत्री म्हणाले माझ्यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली; आता कामे थांबविणे अशक्‍य
  • शहरातील सर्वच प्रभागांमध्ये नगरोत्थान योजनेतून होणार 447 प्रकारची कामे
  • निधीच्या समान वाटपासाठी नाही तर टक्‍केवारीसाठी भांडण सुरू असल्याची होतेय चर्चा
  • महापालिकेतील 106 पैकी सुमारे 60 नगरसेवकांना मिळाला सर्वाधिक निधी


'नगरोत्थान'च्या कामांची निघाली निवीदा
नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील सर्वच प्रभागात 13 कोटी 90 लाखांची कामे होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेनुसार त्यापैकी काही कामांची निवीदाही निघाली आहे. दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण करावी लागणार असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.
- संदीप कारंजे, नगरअभियंता, सोलापूर महापालिका

गटनेते गप्प पण विरोधी पक्षनेते आक्रमक
महापालिकेची बिघडलेली आर्थिक घडी, मक्‍तेदारांचे थकेलेली कोट्यवधींची बिले आणि त्यातच राज्य सरकारकडून महापाकिलेला नगरोत्थान योजनेतून 13 कोटी 90 लाखांचा निधी मिळाला. खूप महिन्यानंतर एवढा मोठा निधी मिळाल्याने सत्ताधारी व विरोधक अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी आक्रमक झाले आहेत. सर्वसाधारण सभेतील सूचना व उपसुचनेनुसार कामांच्या यादीत व निधीत बदल झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, प्रत्येक पक्षातील नगरसेवकांना या योजनेतून किती निधी मिळाला याची पडताळणी करावी गटनेत्यांनी करावी, असे महेश कोठे म्हणाले. मात्र, अद्याप गटनेते गप्पच आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता कोणत्या नगरसेवकांना किती निधी मिळाला, भाजपच्या किती व कोणत्या नगरसेवकांना किती निधी मिळाला, याचा शोध सुरु झाला आहे. जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देऊनही कामे थांबलेली नाहीत. त्यामुळे महेश कोठे आता काय भूमिका घेणार, याची उत्सुकता लागली आहे. जनहित याचिका दाखल करणार का, आता कामे सुरु झाली असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अथवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काम थांबविणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

वाद नेमका कशासाठी?
नगरोत्थान योजनेतून महापालिकेस निधी मिळाल्यानंतर त्यातून शहराचा विकास, प्रभागाचा विकास, लोकहिताची कामे करण्यासाठी भांडण सुरु झाल्याचे चित्र आहे. मात्र, प्रत्यक्षात हा वाद कामातून मिळणाऱ्या टक्‍केवारीसाठी सुरु झाल्याची चर्चा आता शहरात सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर आता आगामी दोन वर्षांत 13 कोटी 90 लाख रुपयांतून किती व कोणती कामे होणार, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे त्या कामांची गुणवत्ता काय असणार, याकडे आयुक्‍त तथा संबंधित अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, एकाच कामाची दोनदा बिले काढणे, काम न करतानाही बिले उचलणे असे प्रकार महापालिकेत घडल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला आहे. त्यामुळे अशा प्रकारांची चौकशी होईल का, याचीही उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com