साताऱ्याहून मुलगी पाहायला आले अन्‌ लग्नच करून निघाले ! वाटेतच वधूने असे काही केले ज्याने वराला फुटला घाम

तात्या लांडगे 
Saturday, 20 February 2021

मुलगी पाहिल्यानंतर सचिनला ती पसंत पडली. त्यानंतर मध्यस्थी करणाऱ्यांनी गडबड करून विवाह लावून दिला. मध्यस्थी केल्याबद्दल एक लाख 60 हजार रुपये घेतले. रात्री साडेनऊ वाजता विवाह उरकला आणि साताऱ्याच्या दिशेने सर्वजण निघाले... 

सोलापूर : आसवली (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सचिन ढमाळ यांच्या विवाहासाठी त्यांचा मावस भाऊ अंकुश ढमाळ, आई अलका ढमाळ, वडील चंद्रकांत ढमाळ हे सर्वजण शुक्रवारी (ता. 19) ओळखीच्या व्यक्‍तींद्वारे सोलापुरातील शेळगी परिसरात आले. मुलगी पाहिल्यानंतर सचिनला ती पसंत पडली. त्यानंतर मध्यस्थी करणाऱ्यांनी गडबड करून विवाह लावून दिला. मध्यस्थी केल्याबद्दल एक लाख 60 हजार रुपये घेतले. रात्री साडेनऊ वाजता विवाह उरकला आणि साताऱ्याच्या दिशेने सर्वजण निघाले. त्यानंतर वाटेतच पाकणी (ता. उत्तर सोलापूर) परिसरातील सुनील हॉटेलवर जेवायला थांबले. मुलीला साडीत त्रास होत असल्याने ड्रेस घालण्यासाठी जातो म्हणून मुलगी व तिची मावशी हॉटेलपासून दूर गेल्या. मात्र, त्यांनी पळून जाण्याचा प्लॅन केला आणि त्या ठिकाणी लपून बसल्या. 

विवाह लावून देण्याचे खोटे सांगून फसवणूक केल्याची फिर्याद अंकुश ढमाळ यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी वधू अन्नू सिकाटोल्लू, दीपा जाधव, लालासाहेब पवार, पूजा उपाध्ये, धनाजी पाटील यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील बिराजदार मावशी, ज्योत्स्ना, सचिन पांडव आणि बापू ढवळे हे अद्याप फरार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

धक्‍कादायक बाब म्हणजे विवाहावेळी सांगितलेले मुलीचे व तिच्या मावशीचे नाव वेगळेच असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. वधूचे नाव पूजा पवार नसून अन्नू विशाल सिकाटोल्लू आहे अन्‌ तिच्या मावशीचे नाव पूजा दाणेटिया नसून पूजा उपाध्ये असल्याचेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. या सर्वांनी यापूर्वी अशी फसवणूक केली आहे का? यामध्ये नेमका सूत्रधार कोण? याचा शोध सुरू असल्याचेही श्री. पवार यांनी या वेळी सांगितले. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार म्हणाले... 

 • आसवली (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील अंकुश ढमाळ हे त्यांचा मावस भाऊ सचिन ढमाळ यांच्या लग्नासाठी ओळखीतून सोलापुरात विवाहासाठी आले 
 • अंकुश ढमाळ यांचा नातेवाईक लालासाहेब पवार यांना सचिनसाठी मुलगी पाहण्यास सांगितले 
 • लालासाहेब पवार यांनी त्यांच्या ओळखीच्या धनाजी पाटील (रा. चमकेरी, ता. अथणी, बेळगाव) यांना सचिन ढमाळसाठी मुलगी पाहण्याची केली विनंती 
 • धनाजी पाटील यांनी त्यांच्या ओळखीचे बापू ढवळे (रा. बीड) यांना मुलगी पाहण्यास सांगितले अन्‌ त्यांनी सोलापुरातील ज्योत्स्ना या महिलेचा नंबर दिला 
 • बापू ढवळे यांच्या गावातील एका मुलीचा विवाह धनाजी पाटील यांच्या गावात झाल्याने दोघांची होती ओळख 
 • मुलगी असल्याची खात्री झाल्यानंतर लालासाहेब पवार, धनाजी पाटील यांच्या माध्यमातून 17 फेब्रुवारीला लग्न करण्याचे ठरले 
 • सचिन ढमाळ हे आपल्या नातेवाइकांसह सोलापुरातील बस स्थानकावर पोचले; तिथून धनाजी पाटील, सचिन पांडव यांनी त्यांना मुलीच्या घरी नेले 
 • मुलगी सलगर वस्ती (लिमयेवाडी) परिसरात राहत असतानाही त्यांनी हैदराबाद रोडवरील एका पत्र्याचे शेड हेच त्यांचे घर असल्याचे सांगितले 
 • मध्यस्थी करून लग्न जमविल्याबद्दल सचिन ढमाळ यांच्याकडून लालासाहेब पवार, धनाजी पाटील यांनी एक लाख 60 हजार रुपये घेतले 
 • मुलीला नातेवाईक कोणीच नाहीत म्हणून घाईगडबडीत विवाह लावून दिला; रात्री साडेदहा वाजता साताऱ्याच्या दिशेने ढमाळ कुटुंब निघाले 
 • मुलीच्या मावशीने भूक लागल्याचे सांगत पाकणीजवळील सुनील हॉटेलवर जेवणासाठी थांबविले; साडीऐवजी मुलगी ड्रेस घालेल म्हणून त्या बाजूला गेल्या 
 • खूपवेळ होऊनही परत येत नसल्याने ढमाळ यांच्या कुटुंबीयांनी मुलगी व तिच्या मावशीचा शोध घ्यायला सुरवात केली 
 • त्या दोघीही हॉटेलजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपून बसलेल्या दिसल्या; त्यांनी ग्रामीण पोलिसांना सांगितले आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले 
 • सर्वांनी मिळून आपली फसवणूक केल्याची तक्रार अंकुश ढमाळ यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली; त्यानंतर पोलिसांनी पाचजणांना अटक केली 
 • संशयित आरोपींना न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलिस कोठडी; कोथरुडपर्यंत पाठलाग करूनही ज्योत्स्ना व बिराजदार या पळून जाण्यात यशस्वी ठरल्या 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guests from Satara who came to see the girl were cheated in Solapur