esakal | पंढरपुरात गुजराती दाल बाटी देणाऱ्या गुंडेवार : पतीच्या व्यवसायामध्ये दिली साथ; पावभाजी, धपाटेंनाही ग्राहकांची पसंती 
sakal

बोलून बातमी शोधा

Navdurga Pandhrarpur.jpg

याबाबत शुभांगी गुंडेवार यांनी सांगितले की, पाककलेची आवड असली तरी विक्री साठी पदार्थ बनवण्याचा विचार पूर्वी कधी केला नव्हता. दर्जामध्ये तडजोड न करता उत्तम पदार्थ आम्ही बनवत असल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. मागणी वाढल्यास अन्य महिलांना देखील रोजगार मिळवून देता येईल.

पंढरपुरात गुजराती दाल बाटी देणाऱ्या गुंडेवार : पतीच्या व्यवसायामध्ये दिली साथ; पावभाजी, धपाटेंनाही ग्राहकांची पसंती 

sakal_logo
By
अभय जोशी

 आम्ही नवदुर्गा 

पंढरपूर ः येथील शुभांगी राहुल गुंडेवार यांनी पंढरपुरातील रसिक खवय्यांना फारसा परिचित नसलेला अस्सल गुजराती दाल बाटी हा पदार्थ उपलब्ध करुन दिला आहे. स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बळकट करत त्यांनी पंढरपुरात गुणवत्तापूर्ण खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय वाढवला आहे. त्यांच्या दाल बाटी बरोबरच मिसळ, पावभाजी, धपाटे या अन्य पदार्थाना देखील मोठी पसंती मिळत आहे. 

येथील कृषी औषधांचे व्यापारी राहुल गुंडेवार यांच्या पत्नी शुभांगी यांचे माहेर पंढरपूर आणि सासरही पंढरपूरच आहे. दोन्ही कडील घरे प्रतिष्ठित आहेत. उत्तम व्यापार सुरु असताना उधारी वसूल न झाल्याने राहुल गुंडेवार अडचणीत आले. अनेक प्रश्न उभे राहिले परंतु खचून न जाता त्यांच्या पत्नी शुभांगी यांनी जिद्दीने राहुल यांना साथ देण्याचा निश्‍चिय केला. शुभांगी एन्टरप्रायझेसची स्थापना करुन त्यांनी अनेक चविष्ट आणि दर्जेदार पदार्थ लोकांना ऑर्डरनुसार घरपोच करायला सुरुवात केली. राहुल यांची साथ आणि त्यांच्या मोठ्या जनसंपर्काचा देखील त्यांना चांगला उपयोग होत आहे. लाईफ लाईन हॉस्पिटलजवळ त्यांनी पदार्थांचे विक्री काउंटर सुरु केले आहे. 

गुंडेवार यांना लहानपणापासून पाक कलेची आवड होती. परंतु हे पदार्थ विक्री करण्याचा त्यांनी कधी विचार केला नव्हता. त्यांनी पंढरपुरातील खवय्यांना फारसा परिचित नसलेला गुजराती दालबाटी पदार्थ बनवून विक्री करण्यास सुरुवात केली. शुध्द तुपातील या दालबाटी ला पंढरपुरातील खवय्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शुभांगी यांचा हुरुप वाढला. त्यांनी दालबाटी बरोबरच मिसळ, पावभाजी, धपाटे असे अनेक टेस्टी पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. ज्यावेळी जास्ती ऑर्डर असते त्यावेळी अन्य काही महिलांना मदतीला घेऊन त्यांना ही रोजगार मिळवून देतात. गुंडेवार दांम्पत्याच्या वैष्णवी आणि तन्वी या दोन्ही कन्या देखील सुगरण आहेत. त्या दोघी विविध प्रकारचे केक, पिझ्झा, सॅन्डविच बनवतात. नव्या पिढीला आवडणाऱ्या या पदार्थांना ही मागणी वाढत आहे. 

याबाबत शुभांगी गुंडेवार यांनी सांगितले की, पाककलेची आवड असली तरी विक्री साठी पदार्थ बनवण्याचा विचार पूर्वी कधी केला नव्हता. दर्जामध्ये तडजोड न करता उत्तम पदार्थ आम्ही बनवत असल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. मागणी वाढल्यास अन्य महिलांना देखील रोजगार मिळवून देता येईल. तरुणाईकडून होणाऱ्या मागणीचा विचार करुन आणखी काही नाविण्यपूर्ण पदार्थ विक्री साठी उपलब्ध करण्याचा विचार सुरु आहे.