पंढरीत कोरोनाचा पाॅझिटीव्ह आढळल्याने नगर प्रदक्षिणा केला बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

मागील पंधरा दिवसांपूर्वीच पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त झाला होता. कोरोनामुक्तीचा आनंद साजरा केला जात असतानाच ऐन आषाढी वारीत एकाला कोरानाचा संसर्ग झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर : ऐन आषाढी यात्रेत पंढरीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका शिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे राज्य पातळीवरील प्रशासन देखील हादरुन गेले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजच आषाढी एकादशीची विठ्ठाची शासकीय महापूजा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यात्रा काळात पंढरपूर शहरातील कोरोनाचा संसर्ग थोपवण्याचे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. आतापर्यंत शहर व तालुक्‍यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 झाली आहे. 

मे महिन्यात पंढरपूर तालुक्‍यातील उपरी गावात पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर शहर व तालुक्‍यात आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मागील पंधरा दिवसांपूर्वीच पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त झाला होता. कोरोनामुक्तीचा आनंद साजरा केला जात असतानाच ऐन आषाढी वारीत एकाला कोरानाचा संसर्ग झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वारी काळातच कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने येथील प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 
येथील माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. त्यानंतर प्रशासनाने तातड़ीने प्रदक्षिणा मार्ग शील केला आहे. वारीकाळात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने गेल्या तीन महिन्यांपासून आऱोग्याची काळजी घेणार्या पंढरपूकरांच्या मेहनतीवर मात्र पाणी फिरले आहे. 

शहर व तालुका कोरोनामुक्त झाल्यानंतर शहरातील सर्व दुकाने व व्यवहार सुरळीत सुरु झाले होते. कोरोना पुन्हा शहरात येणार नाही याच अर्विभावात प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक स्वतःला मिरवत होते. परंतु अचानक शहर व तालुक्‍यात दोन रुग्ण सापडल्याने कोरोनाची साखळी वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. 

शहरात सापडलेल्या एका कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात जवळपास 145 जण आले आहेत. यामध्ये 51 जन हायरिस्क तर 94 जन लोरिस्कमध्ये आहेत. हायरिस्कमध्ये एका महिला अधिकार्याचा देखील समावेश असल्याचे समजते. या सगळ्यांना संस्थात्माक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर लोकरिस्क मधील 94 जणांना होमक्वांरटाईन करण्यात आले आहे. वाखरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये या रुग्णांवरती उपचार सुरु कऱण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी दिली. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भिती 
शहरात सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णाचे स्वॅब घेतल्यानंतर त्याला होम क्वांरटाईन होण्याची सूचना दिली होती. परंतु संबंधीत रुग्णांने अनेक बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आज सकाळी कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर ही संबंधीत व्यक्ती रस्त्यावरुन फिरून गेल्याची चर्चा आहे. संशयीत रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर त्याला तातडीने संस्थात्मक क्वारंटाईन करणे आवश्‍यक असतानाही संबंधी रुग्णाला घरीच का ठेवण्यात आले. या प्रकारामुळे आरोग्य व प्रशासकीय यंत्रणे विषयी व त्यांच्या बेफिकरी बद्दल शहरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

प्रदक्षिणा मार्ग बंद 
प्रदक्षिणा मार्गावरच कोरोना बाधीत रुग्ण सापडल्याने वरिष्ठ अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. यात्राकाळात वारकर्यांना प्रवेश देण्यावरुन वाद सुरु असतानाच शहरात अचनाक कोरोनाचा संसर्ग झाल्याने वरिष्ठ अधिकार्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वारकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला प्रदक्षिणा मार्गाच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी प्रशासनाकडून कोणती उपाय योजना केली जाणार याकडेच वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले आहे. 

करकंब येथेही रूग्ण 
तसेच ठाण्यावरून करकंब येथे आलेला एक जण आज कोरोनाबाधित आढळून आला आहे. करकंब येथील एक जण ठाणे येथे वाहनचालक म्हणून काम करत होते. ते राहत असलेल्या खोलीतील इतरांना कोरोनाची लागण झाल्याने ते ट्रकमधून करकंब येथे आले होते. आपणासही कोरोनाची लागण झालेली असू शकते, या विचाराने त्यांनी थेट ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे तातडीने योग्य ती खबरदारी घेत डॉ. तुषार सरवदे यांनी त्यांचा स्वॅब घेऊन त्यांचे वाखरी येथे संस्थात्मक विलगीकरण केले. त्याचा आज सकाळी तपासणी रिपोर्ट प्राप्त झाला असून तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ठाण्यावरून आल्यापासून ती व्यक्ती कोणाच्याही संपर्कात आलेली नाही. दरम्यान, आज कोरोनाबाधित आढळून आलेली व्यक्ती करकंबसह पंढरपूर तालुक्‍यात कोणाच्याही संपर्कात आलेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन करकंब ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार सरवदे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Having tested positive for corona in white City tour closed