संस्कारक्षम श्‍यामची आई पुस्तकाच्या एक लाख प्रती त्यांनी पोहोचवल्या विद्यार्थ्यांच्या हातात

प्रकाश सनपूरकर
गुरुवार, 25 जून 2020

साने गुरुजी कथामालेच्या चळवळीत हा अगदी मैलाचा टप्पा मानला जातो. सोलापुरात साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून ही चळवळ रुजली. श्‍यामची आई हे पुस्तक तर सर्वोत्कृष्ट संस्कार पुस्तक म्हणून अगदी लोकप्रिय आहे.

सोलापूर - श्‍यामची आई हे मराठी संस्कारमालिकेतील अत्यंत महत्त्वाचे पुस्तक म्हणून ओळखले जाते. आजही या पुस्तकाची गणना सर्वोत्कृष्ट संस्कारक्षम पुस्तकांमध्ये कायम आहे. श्‍यामची आई हे संस्कारक्षम पुस्तक पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आता या पुस्तकाच्या एक लाख प्रती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा विक्रम आता सोलापूरकरांच्या नावे होत आहे. विद्यार्थ्यामध्ये एखाद्या पुस्तकाचा एवढा मोठा प्रसार होणे ही सोलापूरकरासाठी विशेष बाब मानली जाते. 

साने गुरुजी कथामालेच्या चळवळीत हा अगदी मैलाचा टप्पा मानला जातो. सोलापुरात साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून ही चळवळ रुजली. श्‍यामची आई हे पुस्तक तर सर्वोत्कृष्ट संस्कार पुस्तक म्हणून अगदी लोकप्रिय आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या पुस्तकाची गोडी लागावी यासाठी कथामालेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले. 
2006 मध्ये कथामालेच्या कार्यकर्त्यांनी श्‍यामची आई या पुस्तकाच्या एक हजार प्रती मागवल्या. त्यावेळी विद्यार्थिगृह प्रकाशनाकडून या प्रती मागविण्यात आल्या. कथामालेच्या जिल्ह्यातील अनेक शाखांच्या माध्यमातून श्‍यामची आई पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे ठरले. त्यासाठी श्‍यामची आई या पुस्तकावर विद्यार्थ्यांकरिता परीक्षा घेण्याचे ठरले. दरवर्षी या परीक्षा सुरू झाल्या. त्यासोबत पुस्तकाची खरेदी विद्यार्थी करू लागले. केवळ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी 40 हजार पुस्तकाच्या प्रतींची खरेदी केली. 

यानिमित्ताने मंगल यात्रा उपक्रम सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील 252 शाळांमध्ये ही यात्रा पोचली होती. एकूण तीन लाख विद्यार्थी साने गुरुजींच्या विचारांशी जोडले गेले. पुस्तक विक्रीचा हा उपक्रम ना नफा, ना तोटा तत्त्वावर अजूनही केला जातो. विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून या उपक्रमात सातत्याने वाढता प्रतिसाद मिळत आहे. 
कथामालेच्या सध्या जिल्ह्यातील विवीध शाळा व गावांच्या ठिकाणी 253 शाखा आहेत. या सर्व शाखांमधून श्‍यामची आई पुस्तकाची मागणी नोंदवली जाते. 
नंतर कथामालेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक ठिकाणी पुस्तके छापून घेण्याचे ठरवले. गुणवत्तेची तडजोड न करता ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम अजूनही अव्याहत सुरू आहे. छपाईच्या कामासाठी देणगीदार योगदान देत असल्याने आजही विद्यार्थ्यांना अगदी 20 रुपयांत पुस्तक देण्याचे काम केले जात. या चळवळीत आता महत्त्वाचा टप्पा आला आहे. आता या पुस्तकाच्या एक लाख प्रतीचा विक्रम नोंदवला जात आहे. एक लाख प्रतीचा आकडा गाठल्याबद्दल विशेष कार्यक्रम केला जाणार आहे. 

महाविद्यालयीन तरुणांना हवे शामची आई 
शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन तरुणांकडून देखील श्‍यामची आई या पुस्तकाची मागणी केली जात आहे. सातत्याने छपाई करून पुस्तके कमी पडत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अजून तरी नियोजन करता आले नाही. 

ही तर विद्यार्थ्यांची संस्कार चळवळ 
श्‍यामची आई पुस्तकाचा संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्ते, देणगीदार, माध्यमे यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यामुळे एक लाख प्रती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता आल्या. 
- अवधूत म्हमाणे, अध्यक्ष, साने गुरुजी कथामाला शाखा सोलापूर व विश्‍वस्त अ. भा. साने गुरुजी कथामाला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He delivered one lakh copies of the book Sanskaraksham Shyaamchi Ai to the students