
नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) ः माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर साखर कारखाना व चांदापुरी येथील शेतकरी साखर कारखाना सुरू करून ऊस उत्पादकांचे नुकसान टाळावे यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना कारखाने सुरू करण्यासाठी मागणी करण्याचा निर्णय एका महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.
सदाशिवनगर येथे भानुदास सालगुडे-पाटील यांच्या घरी झालेल्या बैठकीस सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, खंडकरी शेतकऱ्यांचे नेते बी. डी. पाटील, ऍड. सोमनाथ वाघमोडे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. रामदास देशमुख, सदाशिवनगर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भानुदास पाटील, माजी संचालक तुळशीराम सुतार, विलास आद्वट, श्री शंकर साखर कारखाना बचाव समितीचे उपाध्यक्ष भानुदास सालगुडे-पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, पोपट सरगर, बबन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बी. डी. पाटील व भानुदास सालगुडे-पाटील यांनी सांगितले, की मागील वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाची लागणी मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. मागील वर्षापासून वरील दोन्ही साखर कारखाने बंद असल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांची मोठी अडचण होत आहे. दोन दोन वर्षे ऊस शेतात उभा आहे. त्यामुळे वरील दोन्ही साखर कारखाने राज्य सरकारने मदत करून किंवा इतर कोणत्याही मार्गाने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच सर्व उसाचे गाळप होणार आहे अन्यथा शेतात ऊस उभा राहणार आहे. माळशिरस तालुक्यात दोन्ही साखर कारखान्यांवर अवलंबून असणारा पाच लाख टन ऊस उभा आहे.
याशिवाय माळशिरस तालुक्यात औद्योगिक वसाहत, नीरा-देवधरचे पाणी, नीरा उजवा कालवा यावर पूर्वीप्रमाणेच पाणी देण्यात यावे, लोणंद-फलटण-पंढरपूर या रेल्वेमार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत. शेती महामंडळाची 15 गावांना गावठाणासाठी जमीन मिळावी. तालुक्यातील पश्चिम भागात विद्या प्रतिष्ठानसारखे शैक्षणिक संकुल उभा करावे आदी मागण्या शरद पवार यांना भेटून हे शिष्टमंडळ करणार आहे. सोमनाथ वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संघटनाचा प्रयत्न
बैठकीतील बरेच कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे मोहिते-पाटील गटाचे असून लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून वरील गट राष्ट्रवादीसोबत राहिलेला आहे. यानिमित्ताने तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन करण्याचा प्रयत्न दिसून येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.