पंढरपूर शहरातील जड वाहतुकीमुळे डोकेदुखी; अरुंद आणि खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले 

भारत नागणे 
Thursday, 29 October 2020

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम म्हणाले, या रस्त्यावरुन होणारी जड वाहतूक बंद करण्यासंबंधी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण पवार आणि वाहतूक शाखेला सूचना दिल्या आहेत. पुढच्या दोन दिवसात या मार्गावरुन होणारी जड वाहतूक बंदी केली जाईल. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरातून जड वाहतूक वाढल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. शहरातील मध्यवस्तीतून राजरोजपणे दिवस-रात्र जाड वाहतूक सुरु असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुका पोलिस ठाणे ते डीव्हीपी मॉल दरम्यानच्या अरुंद आणि खड्डेमय रस्त्यावरुन मागील अनेक दिवसांपासून जड वाहतूक सुरु आहे. या वाढत्या जड वाहतूकीमुळे स्थानिक रहिवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. 

नगरपालिकेच्या या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच रस्त्यावरुन मुरुम, वाळू, वीट, ऊस वाहतूकीसह इतर जड वाहनांची ये-जा वाढली आहे. त्यातच इतर ट्रेलर (मोठे ट्रक), कंटेनर, ट्रॅक्‍टरसह मालवाहतुकीच्या अनेक मोठ्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच रस्त्यावर शाळा आणि रहिवाशी इमारती असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची सतत ये-जा सुरु असते. जड वाहतुकीमुळे या भागात अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी तयार केलेल्या रस्त्यावरुन चक्क जड वाहतूक सुरु असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

सरगम चौक, केबीपी कॉलेज चौकातून पुढे लिंकरोड मार्गे जड वाहतूक होणे आवश्‍यक असताना शॉर्टकट म्हणून या रस्त्याचा वापर वाढला आहे. जड वाहतुकीमळे या भागात मोठा अपघात होण्यापूर्वीच पोलिसांनी येथून होणारी जड वाहतूक बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे. 

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम म्हणाले, या रस्त्यावरुन होणारी जड वाहतूक बंद करण्यासंबंधी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण पवार आणि वाहतूक शाखेला सूचना दिल्या आहेत. पुढच्या दोन दिवसात या मार्गावरुन होणारी जड वाहतूक बंदी केली जाईल. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Headaches due to heavy transport in Pandharpur city Narrow and bumpy roads increased the number of accidents