सोलापूर शहरातील गैबी पीर दर्गापरिसरात घाणीचे साम्राज्य 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

या ठिकाणचे राहिवाशी नितिन चाटी म्हणाले की, या परिसरात महापालिकेकडून स्वच्छता राखली जावी. परिसराची स्वच्छता करण्याचा प्रश्‍न सामंजस्याने सुटावा म्हणजे नागरिकांना ते आरोग्यदायी ठरू शकेल. 

सोलापूर : होटगी रोड येथील गैबी पीर दर्गापरिसरात ओंकार अपार्टमेंट व अन्य इमारतींना लागून असलेल्या मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याठिकाणी शेजारील अपार्टमेंटचे संपूर्ण घाण पाणी, मैला उघड्यावर वाहत असून परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. 
अस्वच्छतेमुळे येथील नागरिकांना वारंवार आजाराला तोंड द्यावे लागत आहे. 

यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सध्या कोविड मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यात याठिकाणी निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. येथील मोकळ्या जागेतील घाणीमध्ये काटेरी झाडी झुडपे वाढली आहेत. या परिसरात डुकरे व मोकाट कुत्री पिल्लांना जन्म घालतात. बऱ्याचदा डुकरे व मोकाट कुत्री यांची भांडणे होऊन ती पिल्ले मरून पडतात, त्यांची दुर्गंधी सुटते. यासोबतच सर्वत्र घुशी व सापांचे वास्तव्य या भागात असते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेजारीच गैबी पीर झोपडपट्टी आहे, तेथे अनेक गरीब कुटुंबे वास्तव्यास आहेत. परिसरातील शेकडो कुटुंबाना यापासून त्रास होत आहे. 
याबाबत महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोकळ्या जागेच्या मालकांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.  या ठिकाणचे राहिवाशी नितिन चाटी म्हणाले की, या परिसरात महापालिकेकडून स्वच्छता राखली जावी. परिसराची स्वच्छता करण्याचा प्रश्‍न सामंजस्याने सुटावा म्हणजे नागरिकांना ते आरोग्यदायी ठरू शकेल. 

संपादन : अरविंद मोटे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The health of the citizens is in danger in the premises of Gabby Peer Dargah in Solapur city