esakal | मंगळवेढ्यातील आरोग्य उपकेंद्रे रखडली लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ! कोरोनाच्या दहशतीत नागरिक मात्र संभ्रमात 

बोलून बातमी शोधा

Arogya Kendra}

कोरोनाच्या प्रभावानंतर दुसऱ्या लाटेची भीती असताना तसेच मंगळवेढा तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मंजूर असलेल्या नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांस व प्रस्तावित उपकेंद्राला अद्याप मुहूर्त सापडेना. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था सक्षम होणे आवश्‍यक आहे. 

solapur
मंगळवेढ्यातील आरोग्य उपकेंद्रे रखडली लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ! कोरोनाच्या दहशतीत नागरिक मात्र संभ्रमात 
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाच्या प्रभावानंतर दुसऱ्या लाटेची भीती असताना तसेच मंगळवेढा तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मंजूर असलेल्या नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांस व प्रस्तावित उपकेंद्राला अद्याप मुहूर्त सापडेना. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था सक्षम होणे आवश्‍यक आहे. 

आरोग्य खात्यात रिक्त पदे देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्याबाबत पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत चर्चा होऊन देखील ही रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यामुळे आजच्या बैठकीतून आरोग्य खात्याचे सक्षमीकरण करणार, की पुन्हा दुर्लक्ष करणार? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. 

तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने कात्राळ, सोड्डी, येड्राव, खोमनाळ, ढवळस, अकोला, लेंडवे चिंचाळे, सलगर खु, कचरेवाडी अशा नऊ गावांत प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळाली. परंतु ढवळस व लेंडवे चिंचाळेला जागा उपलब्ध झाली नाही. मात्र मंजूर उपकेद्रास निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा कमी पडल्याने या उपकेंद्राचे काम रखडले आहे. 

जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांत मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांस त्या तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी निधी नेऊन ती कामे मार्गी लावली. मंगळवेढ्यातील कामास मात्र अद्याप मुहूर्त मिळेना. आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या उपकेंद्रांसाठी जागेची व निधी उपलब्ध न केल्यामुळे तालुक्‍यातील जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर प्रस्तावित असलेल्या शिरनांदगी, लोणार, नंदूर, तळसंगी, गुंजेगाव, चिक्कलगी, दामाजीनगर याबरोबरच उचेठाण (कारखाना साईट), हुलजंती प्राथमिक आरोग्य केंद्राचा तर निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित आहे. 

आरोग्य सुविधेसाठीचा निधी जिल्हा नियोजनकडून येत असून त्याबाबतचा निर्णय आरोग्य समिती घेत असते. हळूहळू हा प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. 
- डॉ. शीतलकुमार जाधव, 
जिल्हा आरोग्य अधिकारी 

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तालुक्‍यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने मंजूर आरोग्य उपकेंद्रांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच प्रश्‍न मार्गी लागेल. 
- प्रदीप खांडेकर, 
माजी सभापती, मंगळवेढा 

जागतिक संकट असलेल्या कोरोनाचा विचार करता, नंदूर येथील मंजूर उपकेद्रास तातडीने मंजुरी दिल्यास बोराळे केंद्रावरील ताण कमी होऊ शकतो. परिसरातील सीमावर्ती भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. 
- लक्ष्मण पवार, 
तालुकाध्यक्ष, गवंडी, बिगारी संघटना 

संपादन : श्रीनिवास दुध्याल