आमदार मानेंच्या अगोदर क्षीरसागरांची सुनावणी, प्रश्‍न जात प्रमाणपत्राचा : सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणीकडे आज सुनावणी 

प्रमोद बोडके
Thursday, 29 October 2020

प्रांताधिकाऱ्यांकडेही झाली सुनावणी 
नागनाथ क्षीरसागर यांनी बार्शी तालुक्‍यातील आळजापूर येथील मूळ पत्यावरुन 27 जून 2014 रोजी हिंदू खाटीक जातीचे प्रमाणपत्र मिळविले आहे. हे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी आमदार माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी बार्शीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे केली होती. या प्रकरणावर 27 ऑक्‍टोंबरला प्रांताधिकारी निकम यांनी सुनावणीही घेतली आहे. त्यानंतर हा विषय सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सोपविण्यात आला आहे. सोलापूरची जात प्रमाणपत्र पडताळणी समिती काय निर्णय घेणार? यावर बऱ्याच राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी अवलंबून आहेत. 

सोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्याविरोधात बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल झालेल्या तक्रारीचा निर्णय प्रलंबित असतानाच आता मोहोळमधून जात प्रमाणपत्राचा नवीन मुद्दा समोर आला आहे. मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांच्याकडे असलेले हिंदू खाटीक जातीचे अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार आमदार माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी केली आहे. या तक्रारीवर  (गुरुवार, ता. 29) सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सुनावणी होणार आहे. 

आमदार माने यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातून कैकाडी जातीचा (अनुसूचित जाती) दाखला आणल्याची तक्रार नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर यांनी केली आहे. ऑगस्टमध्ये केलेल्या या तक्रारीवर अद्यापही बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. क्षीरसागर यांची तक्रार प्रशासनाच्या कारभारात अडकलेलीच असताना आमदार माने यांचे बंधू हनुमंत यांनी क्षीरसागर यांच्या जात प्रमाणपत्रावर तक्रार केली आणि तत्काळ सुनावणीची तारीखही मिळविली आहे.

जात प्रमाणपत्रावर काम करणाऱ्या एकाच सामाजिक न्याय विभागाचा असा भेदभाव का? असा प्रश्‍न सोमेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची कामे वेळेवर मार्गी लागतात आणि शिवसेना नेत्यांची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत, असाच मेसेजही या दोन्ही जात प्रमाणपत्र प्रकरणातून गेल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. 

(गुरुवारी, ता. 29) होणाऱ्या सुनावणीत नागनाथ क्षीरसागर यांनी कागदपत्र व पुराव्यासह उपस्थित रहावे, अन्यथा आपणास या तक्रारीबाबत काही म्हणणे नाही, असे समजून समिती उपलब्ध पुराव्याच्या आधारे गुणवत्तेनुसार निर्णय घेईल, असा इशाराही सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य सचिवांनी या नोटीसमध्ये दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hearing of Kshirsagar before MLA Mane, Question of Caste Certificate: Hearing today at Solapur Caste Certificate Verification