वाखरी ते पंढरपूर पादुका पायी आणण्याबाबतच्या याचिकेवर मंगळवारी होणार सुनावणी

Hearing will be held on Tuesday on the petition to bring footwear from Wakhari to Pandharpur
Hearing will be held on Tuesday on the petition to bring footwear from Wakhari to Pandharpur

पंढरपूर (सोलापूर) : श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंगळवारी 30 जून रोजी वाखरीपासून पंढरपूरपर्यंत मोजक्या १०० वारकऱ्यांच्या उपस्थित चालत घेऊन जाण्यास परवानगी देण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयात ऑनलाइन रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज निर्णय झाला नाही.  मंगळवारी दुपारी सुनावणी होणार असून ही याचिका मंजूर झाल्यास प्रशासनाची धावपळ होणार आहे. वाखरी ते पंढरपूर दुतर्फा पोलिस बंदोबस्त ठेवणे,  स्वच्छता करणे यासह अनेक कामे अवघ्या काही तासात करावी लागणार आहेत. न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेणार आहेत.
पंढरपूरच्या आषाढी यात्रेला सुमारे आठशे वर्षांची परंपरा आहे. आत्तापर्यंत अनेक वेळा चंद्रभागा नदीला महापूर आले. पंढरपुरात प्लेग सारख्या साथी आल्या परंतु कधीही आषाढी यात्रेच्या या परंपरेत खंड पडला नव्हता. यंदा आषाढी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात आले तर कोरोनाचा संसर्ग वाढेल या भीतीने शासनाने आषाढी यात्रा रद्द केली. यात्रेसाठी कोणीही वारकरी भाविकांनी पंढरपूरला येऊ नये, भाविकांनी आपल्या घरीच थांबून विठ्ठलाची प्रार्थना करावी अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. दुसरीकडे काही संतांच्या पादुका हेलीकॉप्टर अथवा एसटी बस मधून पंढरपूरला घेऊन जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. किमान काही वारकऱ्यांना पायी चालत पंढरपूरला जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी काही मंडळी करत होती परंतु कोरोना चा संसर्ग वाढेल या भीतीने शासनाने ती मान्य केलेली नाही.
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील वारकरी सेवा संघाचे किशोर कामठे आणि विलास बलवाडकर यांनी गोविलकर अँड असोसिएट्स यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली आहे. 
आषाढी यात्रेच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीही खंड पडलेला नाही. हे लक्षात घेऊन देहू, आळंदी ते पंढरपूर या सुमारे 250 किलोमीटरच्या अंतरा पैकी वाखरी ते पंढरपूर या सहा किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यात मोजक्या शंभर वारकऱ्यांच्या उपस्थित संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका पायी  घेऊन जाण्यास परवानगी मिळावी. आषाढी यात्रेतील महत्त्वाच्या परंपरांच्या पैकी संतांच्या पादुकांचे चंद्रभागा नदीत स्नान आणि आषाढी एकादशी दिवशी संतांच्या पादुका सह नगरप्रदक्षिणा करता यावी. शंभर वारकऱ्यांच्या उपस्थित शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्ती यांचे पालन करत ही परंपरा पूर्ण करण्यास परवानगी देण्यात यावी. संबंधित सहभागी होणाऱ्या शंभर व्यक्तींची नावे, त्यांचे पत्ते तसेच आवश्यक कोरोना चाचणी करून घेण्यास तयारी असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सोहळा झाल्यानंतर चौदा दिवस संबंधित सर्व लोक विलगीकरणात राहतील जेणेकरून संसर्गाचा धोका होणार नाही असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथपुरी यात्रेच्या संदर्भात अगदी शेवटच्या काळात काही अटी आणि निर्बंध घालून परवानगी दिलेली आहे. त्याचाच आधार घेत महाराष्ट्र शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा अशा प्रकारचा अर्ज संबंधितांनी 28 मे रोजी शासनाकडे दिला होता परंतु शासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात ऑनलाईन रिट याचिका दाखल केली आहे. आज त्यावर सुनावणी झाली नाही उद्या मंगळवारी ही याचिका मंजूर झाली तर प्रशासनाला वाखरी ते पंढरपूर सहा किलोमीटर रस्त्यावर दुतर्फा जागोजागी पोलिस तैनात करणे, हा संपूर्ण रस्ता स्वच्छ करणे, या रस्त्यावरील वाहतूक अन्य रस्त्याने वळवणे अशी अनेक कामे अवघ्या काही तासात करावी लागणार आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी ई-मेल द्वारे महाराष्ट्र शासनाचा गृह, महसूल आणि नगर विकास विभाग, विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, प्रांताधिकारी आणि पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना याविषयीच्या नोटिसा पाठवल्या आहेत.  नगरपालिकेचे मुंबई उच्च न्यायालयात काम करणारे एडवोकेट सारंग सतीश आराध्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयी ची नोटीस मिळाली असून मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून नगरपालिकेचे म्हणणे मांडले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com