
अक्कलकोट तालुक्यात कधीही तासभर पाऊस झाला तरी आनंद व्यक्त करायचा क्षण असतो. पण सलग बारा तास पाऊस तोही वादळी वारा, विजा चमकणे, विद्युत पुरवठा खंडित, गारठवणारी थंडी अशा वातावरणात नागरिक असल्याने शेतकरी व ग्रामस्थ यांच्यात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्यातील सर्वच गावात काल मंगळवारी दहा वाजता सुरू झालेला पाऊस आज बुधवारी सकाळचे दहा वाजत आले तरी धुवांधार पाऊस सुरच आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेईना, तालुक्यातील सर्वच गावातील सखल भागातील ऊस, तूर, भात तसेच फळबागा या पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी पाऊस नाही म्हणून तर यावर्षी प्रचंड पावसाने हवालदिल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकरी वर्गाचा हाताहोंडाशी आलेला घास आजच्या पावसाने हिरावला जाणार आहे. मागील आठवड्यात तुरीची पिके धोक्यात येताहेत असे वाटत होते. अगदी कमी दाबाच्या पट्याच्या पावसाने आज पहाटेपासून भय उत्पन्न झाले आहे. तालुक्यातील कुरनुर धरण यासह अनेक छोटी मोठी तलावे, गावातील ओढे, बंधारे ही आता भरून वाहत आहेत. अनेक गावातील ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाल्याचे स्पष्ट होत आहे.
अक्कलकोट तालुक्यात कधीही तासभर पाऊस झाला तरी आनंद व्यक्त करायचा क्षण असतो. पण सलग बारा तास पाऊस तोही वादळी वारा, विजा चमकणे, विद्युत पुरवठा खंडित, गारठवणारी थंडी अशा वातावरणात नागरिक असल्याने शेतकरी व ग्रामस्थ यांच्यात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. तरीही हवामान खाताच्या आगाऊ अंदाजाने सर्वजण सावध असून स्वतःची व पशुधनाची काळजी घेताना दिसत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून आजच्या सारखा पाऊसच तालुक्यात झाला नसल्याचे जाणकार सांगत आहेत
आजच्या पावसाची वैशिष्ट्ये
- कुरनुर धरणातून सहा दरवाज्यातून तीन हजार क्यूसेक्स पाणी सोडले
- शिरवळवाडी व गळोरगी ही मोठी तलावे सांडव्याने पाणी बाहेर
- सांगवी कोळेगाव, अक्कलकोट ते जेऊर यासह अनेक गावाच्या ओढयावर पाणी आल्याने संपर्क बंद
- तालुक्यातील सर्व ओढे, नाली तलाव ही ओसंडून वाहत आहेत
- अनेक गावातील उभी पिके पाण्यात
- अक्कलकोट- गाणगापूर राज्यमार्गावरील बोरी नदी पुलावर तीन फूट पाणी आल्याने वाहतूक ठप्प
- बोरी नदीखालील आठही बंधाऱ्यावर विस्तीर्ण पाणी लगतची शेती पाण्याखाली
- अक्कलकोट ते वागदरी मुख्य रस्ताही बंद
संपादन - सुस्मिता वडतिले