राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या वारसदारांना मिळाला घरकुलाचा लाभ !

हुकूम मुलाणी 
Monday, 11 January 2021

मंगळवेढा तालुक्‍यातील खवे येथील भारत भोसले, दादाराव भोसले, भारत माळवे, मानेवाडी येथील अग्णू इंगोले व कर्नाटकातील गोंदवण येथील अप्पू भोसले अशी कुटुंबे भिक्षा मागण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील राईनपांडा येथे गेल्यावर, मुले पळवणारी टोळी समजून ग्रामपंचायत कार्यालयात अमानुष हत्या केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. 

मंगळवेढा (सोलापूर) : राईनपाडा हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसदारांना विशेष बाबीतून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुल देऊन प्रशासनाने त्या बेघर कुटुंबाला निवारा उपलब्ध करून दिला. याबाबत "सकाळ'ने आवाज उठवला होता. तालुक्‍यातील खवे येथील भारत भोसले, दादाराव भोसले, भारत माळवे, मानेवाडी येथील अग्णू इंगोले व कर्नाटकातील गोंदवण येथील अप्पू भोसले अशी कुटुंबे भिक्षा मागण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील राईनपांडा येथे गेल्यावर, मुले पळवणारी टोळी समजून ग्रामपंचायत कार्यालयात अमानुष हत्या केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. 

दरम्यान, मृतांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दिवंगत आमदार भारत भालके व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत नातेवाइकांनी राज्यभर फिरताना ओळखपत्र, शिधापत्रिका, घरकुल व मृताच्या नातेवाइकांना शासकीय नोकरी हे प्रश्न उपस्थित केले. जमीयत उल्मा ए हिंद या संघटनेने मुलीच्या विवाहाला मदत केली. त्यानंतर मृताच्या वारसाला दहा लाखांचा निधी दिला. त्यानंतर दिवंगत आमदार भालके यांनी विधानसभेत देखील या प्रश्नावर आवाज उठवला. शिवाय "सकाळ'ने "वर्षभरानंतरही राईनपाड्याच्या जखमा ओल्या, शासकीय पातळीवर दुर्लक्ष' असे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाला जागे केले. 

प्रशासनाने खास बाब म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून तालुक्‍यातील चार कुटुंबांना घरकुल मंजूर केले. या लाभार्थींनी नुकतेच या घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे लोकार्पण त्या कुटुंबाकडे करण्यात आले. या वेळी सहाय्यक प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे, सरपंच विकास दुधाळ, ग्रामसेवक एन. एस. काझी, डी. टी. मुठेकर, घरकुल विभागाचे सचिन येडसे, युवराज सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. 

प्रशासनाने या समाजाला निवारा उपलब्ध करून न्याय दिला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वारसाला नोकरीसाठी दिलेल्या आदेशाचा प्रश्न लटकलेला आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने न्याय द्यावा. विशेषत: या समाजाच्या प्रश्‍नांसाठी "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा करून आवाज उठवण्याचे काम केले. 
- मच्छिंद्र भोसले, 
प्रदेशाध्यक्ष, विमुक्त भटक्‍या जाती 

कुटुंबाचा आधार गेल्यावर आम्ही पोरके झालो. शासनाने मदत निधी, पंचायत समितीने खास बाब म्हणून निवारा उपलब्ध करून आधार दिला; पण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी लक्ष द्यावे. 
- नर्मदा भोसले, 
मृताची पत्नी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The heirs of the deceased in the Rainpada massacre got the benefit of Gharkul