Breaking ! दुचाकीस्वारांकडे हेल्मेट आवश्‍यकच; चौदाशे वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित

तात्या लांडगे
Thursday, 5 November 2020

नियमांचे पालन केल्यास कारवाई होणार नाही
दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे आवश्‍यक असून अनेकदा हेल्मेटमुळे दुचाकीस्वारांचा जीव वाचला आहे. विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट, ओव्हर स्पीड, मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. विमा नसलेल्या वाहनांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूक रोखून अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओतर्फे सातत्याने कारवाई केली जात आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

सोलापूर : हेल्मेट नाही, सिटबेल्टचा वापर केला नाही, अतिवेगाने वाहन चालविले, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दारु पिऊन वाहन चालविणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, माल वाहतूक वाहनातून प्रवासी वाहतूक केली आणि सिग्नल तोडणाऱ्या तब्बल एक हजार 392 वाहन चालकांचे परवाने निलंबीत करण्याची कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु झाली आहे.

 

अपघात कमी होऊन अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शहर व ग्रामीण वाहतूक पोलिस, आरटीओ व राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या वतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे 61 हजार बेशिस्त वाहनचालकांकडून अडीच कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात हेल्मेट नसलेल्या 23 हजार दुचाकीस्वारांचा समावेश आहे. सीटबेल्ट न घालता वाहन चालविणाऱ्या 11 हजार 700, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या 12 हजार, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या चार हजार, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या साडेपाचशे, विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या तीन हजार 293, विमा नसलेल्या दोन हजार आणि मालवाहतूक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहाशे वाहनांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील अपघात वाढले आहेत. कोरोनामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी असतानाही अपघात आणि मृत्यूच्या संख्येत सोलापूर राज्यातील टॉपटेनमध्ये कायम आहे.

 

नियमांचे पालन केल्यास कारवाई होणार नाही
दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे आवश्‍यक असून अनेकदा हेल्मेटमुळे दुचाकीस्वारांचा जीव वाचला आहे. विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट, ओव्हर स्पीड, मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. विमा नसलेल्या वाहनांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूक रोखून अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओतर्फे सातत्याने कारवाई केली जात आहे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

रस्ता सुरक्षा समितीची बैठकच नाही
जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची दरमहा बैठक व्हायला हवी. शहर- जिल्ह्यातील अपघात कमी रोखून ब्लॅकस्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी व्हावेत, यासाठी ठोस उपाययोजना या बैठकीच्या माध्यमातून केल्या जातात. दरम्यान, मार्चपासून सलग 72 दिवस कडक लॉकडाउन असतानाही जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत शहरात 37 अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये 240 अपघातात 264 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी परिस्थिती असतानाही मागील काही महिन्यांपासून रस्ता सुरक्षा समितीची बैठकच झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helmet are a must for two-wheelers; Fourteen hundred drivers' driving licenses suspended