
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 45 हजार 716 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 28 कोटी 62 लाख 60 हजार 145 रुपयांची रक्कम थेट बॅंक खात्यावर जमा केली जात आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 92 घरांसाठी पाच लाख 52 हजार रुपये निधीही संबंधित नागरिकांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी दिली.
सांगोला (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 45 हजार 716 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 28 कोटी 62 लाख 60 हजार 145 रुपयांची रक्कम थेट बॅंक खात्यावर जमा केली जात आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 92 घरांसाठी पाच लाख 52 हजार रुपये निधीही संबंधित नागरिकांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यात यावर्षी गेल्या कित्येक वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील प्रमुख पीक असलेले डाळिंब, द्राक्ष व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. याचा मोठा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे फळधारणा झालेल्या फळबागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नुकत्याच बहार धरलेल्या डाळिंब बागांची मोठ्या प्रमाणात फुलगळती झाली होती. द्राक्षावरील दावण्या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे शेतकऱ्यांना कठीण झाले होते. पिके पाण्याखाली गेल्याने पेरणी केलेली उगवण झाली नाही, तर उगवलेली पिके जागेतच पिवळी पडून करपून गेली.
या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांनी करून त्याचा एकत्रित अहवाल पाठविला होता. राज्य शासनाने सध्या तालुक्यातील 45 हजार 716 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिरायत, बागायत व फळ उत्पादक शेतकऱ्यांना 28 कोटी 62 लाख 60 हजार 145 रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यास सुरवात केली आहे. एक - दोन दिवसांत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.
अतिवृष्टीने शेती पिकांबरोबरच घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. तालुक्यातील 15 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या 92 घरांना पाच लाख 52 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. या पडझड झालेल्या 92 घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांची नुकसान भरपाई त्या नागरिकांच्या खात्यावर जमा करणार असल्याची माहितीही तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी दिली.
शासनाने जाहीर केलेली मदत तोकडी आहे. यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने जाहीर केलेली संपूर्ण मदत शेतकऱ्यांना लवकर मिळाली पाहिजे.
- धनंजय चव्हाण,
शेतकरी, हलदहिवडी, ता. सांगोला
शासनाकडून मिळालेली 28 कोटी 62 लाख रुपयांची अतिवृष्टीची पहिल्या हप्त्याची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. शासनाकडून पुढील निधी प्राप्त झाल्यास तोही ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल
- किशोर बडवे,
नायब तहसीलदार, सांगोला
संपादन : श्रीनिवास दुध्याल