वकिलाने उमटवला शेतीतही ठसा ! रंगीत ढोबळी मिरचीतून उच्चांकी उत्पन्न 

adv. Hajare
adv. Hajare

सोलापूर : मंगळवेढा येथील ऍड. धनंजय हजारे... लहानपणापासूनच शेतीची आवड...993 मध्ये एलएलबी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ वकिली व्यवसायात प्रवेश केला... सुरवातीला तीन वर्षे सोलापूर येथील नामवंत वकील जयकुमार काकडे यांच्याकडे प्रॅक्‍टिस केल्यानंतर पुढे पंढरपूर व मंगळवेढा येथे स्वतंत्रपणे फौजदारी खटल्यांसाठी काम सुरू केले. मात्र, शेतीची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. 2015 मध्ये त्यांनी स्वउत्पन्नातून घरनिकीमध्ये 18 एकर शेती घेतली. 2015-16 मध्ये दीड एकर शेडनेट उभारून ढोबळी मिरची उत्पादनाला सुरवात केली. हळूहळू भाजीपाला, सीताफळ यांची लागवड केली. 

गेल्या चार वर्षांपासून शेडनेटमधील लाल, पिवळ्या दर्जेदार ढोबळी मिरची उत्पादनात सातत्य ठेवत मंगळवेढ्यातील ऍड. धनंजय हजारे पारंगत झाले आहेत. पेशाने वकील असले तरी वृत्तीने उत्तम शेतकरी हीच ओळख त्यांना महत्त्वाची वाटते. रंगीत ढोबळी मिरचीनेच आपल्यात खऱ्या अर्थाने आत्मविश्वासाचा रंग भरल्याची त्यांची भावना आहे. 

मंगळवेढा-मारापूर रस्त्यावर मंगळवेढ्यापासून अवघ्या चार-पाच किलोमीटरवर घरनिकी हे गाव आहे. येथे ऍड. हजारे यांची 18 एकर शेती आहे. त्यात शेडनेटमधील दीड एकर रंगीत ढोबळी मिरची, पाच एकर डाळिंब, पाच एकर शेवगा, चार एकर सीताफळ अशी पिके आहेत. त्यात शेवगा, सीताफळ लागवड नवी आहे. पाच-सहा वर्षांपासून डाळिंब आणि सिमला मिरची ते घेत आहेत. 

त्यांना 2016 मध्ये प्रथम वर्षी ढोबळी मिरची पीक काही साधले नाही. या अपयशाने थोडेसे निराश झाले तरी प्रयत्न सोडले नाहीत. आता ढोबळी मिरची, त्यातही रंगीत ढोबळी मिरची हे त्यांचे हातखंडा पीक झाले आहे. मंगळवेढाच नव्हे तर परिसरातील शेडनेटधारक शेतकऱ्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. 

तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये भगव्या वाणाच्या डाळिंबाची लागवड त्यांनी केली. आतापर्यंत दोनदा उत्पादन घेतले आहे. या वर्षी आता पुन्हा बहर धरला आहे. डाळिंबाचे एकरी सरासरी 7 ते 8 टन उत्पादन मिळते. गेल्या दोन वर्षांत डाळिंबाला 60 ते 70 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे दर मिळाला. ओडिशा जातीच्या शेवग्याची लागवड पाच महिन्यांपूर्वी केली आहे. खर्चातील बचत व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सेंद्रिय व रासायनिक पद्धतीची जोड दिली. एका बाजूला वकिली सुरू असली, तरी शेतीतील श्रमाचे समाधान वेगळेच असल्याची त्यांची भावना आहे. 

लॉकडाउनचा फटका 
गेल्या वर्षी जुलै 2019 मध्ये त्यांनी एक एकर शेडनेटमध्ये रंगीत ढोबळी मिरची केली. पुढे दोन महिन्यात तोडणीस आलेली मिरची पुढे मार्च 2020 पर्यंत चालली. मात्र कोरोना व टाळेबंदीमुळे बाजारात दर उतरले. मिरची काढून टाकावी लागली. हार न मानता जुलैमध्ये पुन्हा रंगीत ढोबळी मिरची लावली. आता त्याची तोडणी सुरू असून, आतापर्यंत पाच टनांपर्यंत उत्पादन निघाले आहे. 

व्यवस्थापन 

  • एक एकर शेडनेटमध्ये लागवड. 
  • बेसल डोसमध्ये 10 ट्रेलर शेणखत, एक टन गांडूळखत, सुपर फॉस्फेट पाच पोती, निमपेंड 10 पोती, एमओपी सहा पोती, 10:26ः26 सहा पोती टाकली 
  • बेडवर ठिबक नळ्या अंथरून दोन ओळींत चार फूट आणि दोन रोपांत दोन फूट याप्रमाणे "झिगझॅग' पद्धतीने 20 जुलैला लागवड केली. एकरी साधारण साडेआठ हजार रोपे लागली. 
  • लागवडीनंतर पाचव्या दिवशी मुळांच्या वाढीसाठी आळवणी केली. 
  • सहाव्या दिवशी पुन्हा कीडनाशक, बुरशी नियंत्रणासाठी, दहाव्या दिवशी पीक वाढीसाठी, पंधराव्या दिवशी मूळ कूजसाठी आळवणी केली. 
  • पहिल्या पंधरवड्यात दरदिवशी फक्त 10 मिनिटे पाणी सोडले 
  • झाडांच्या वाढीनुसार सिंचनाचे प्रमाण वाढवले 
  • पांढरी माशी, अळी, करपा यांसारख्या कीड-रोगनियंत्रणासाठी दर पाच-सहा दिवसांनी प्रतिबंधात्मक व गरजेनुसार उपचारात्मक फवारणीचे नियोजन असते. 
  • वाढीच्या विविध टप्प्यांवर खतांचे नियोजन केले जाते 
  • त्यानंतर दर दहा दिवसांनी शेण, गोमूत्र यांची स्लरी आणि वेस्ट डी-कंपोझर सोडले जाते 
  • 73 व्या दिवशी 3 ऑक्‍टोबरला ढोबळी मिरचीची तोडणी सुरू झाली 


वर्ष                                                   एकरी उत्पादन                 प्रतिकिलो दर 
2016 :                                                 20 टन                             : 40 रुपये 
2019 :                                                 40 टन                       60ते 120 रुपये 
2020 (मार्चपर्यंत) :                                  22 टन                      40 ते 180 रुपये 
2020 (सध्या नवीन प्लॉट सुरू), आतापर्यंत : 5 टन                       70 ते 180 रुपये 

हजारे यांनी केला सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर 
रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय खतांचाही पुरेपूर वापर करतात. ढोबळी मिरची, डाळिंब, सीताफळ या सर्व फळपिकांना त्यांनी शेण-गोमूत्राची स्लरी, जिवामृत सोडले. 
विविध ठिकाणांहून मिळवलेल्या माहितीच्या आधारे झाडाच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होणे, झाडे सशक्त होणे, पानांचा आकार वाढणे या प्रत्येकासाठी प्रभावीपणे काम करणारे स्वतःचे काही फॉर्म्युलेही तयार केले आहेत. हे सेंद्रिय घटक तयार करण्यासाठी खास टाक्‍या तयार केल्या आहेत. शेण आणि गोमूत्रासाठी दोन खिलार गाईंचे संगोपन ते करतात. 

250 ग्रॅमपर्यंत मिरची 
हजारे यांच्याकडील एका मिरचीचे वजन किमान 250 ग्रॅमपर्यंत पोचले आहे. 100 ते सर्वाधिक 300 ग्रॅम वजनापर्यंत एक मिरची भरली आहे. 200 ग्रॅमच्या पुढे वजन असलेल्या मिरचीस ए ग्रेड मानतात. लाल आणि पिवळ्या रंगांच्या ढोबळी मिरचीला पुणे, मुंबईसारख्या शहरातील मॉलमध्ये चांगली मागणी असते. मात्र हजारे ही सर्व मिरची मुंबईतील दादर बाजारपेठेत पाठवतात. मंगळवेढा ते मुंबई रोज जाणाऱ्या ट्रॅव्हल्स गाडीतून दर चार दिवसांनी 25 ते 30 बॉक्‍स पाठवतात. 

शेतीवर सीसीटीव्हीची नजर 
श्री. हजारे यांची संपूर्ण 18 एकर शेती अगदी रस्त्यालगतच आहे. शेतीमालाचे संरक्षण आणि कामांचे व्यवस्थापन, देखभाल या दृष्टीने प्रवेशद्वारापासून शेडनेटसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यांच्याकडे कायमस्वरूपी 10 मजूर असतात. अगदी कोर्टात असतानाही शेतीतील सर्व वेळच्या वेळी होत आहेत की नाहीत याकडे लक्ष ठेवता येते. 

पाण्यासाठी शेततळे, आरओ प्लॅंटही 
त्यांच्या संपूर्ण 18 एकर शेतीला पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत म्हणून नदीवरून पाइपलाइन केली आहे. तसेच विहीर आणि बोअरवेलही आहे. मात्र तरीही संरक्षित सिंचनासाठी एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळेही केले आहे. अशा नियोजनामुळे संपूर्ण शेती सिंचनाची गरज भागते. त्याही पुढे जात सिंचनासाठी पाणी वापरताना "आरओ प्लांट'द्वारे शुद्ध करून वापरले जाते. दोन लाख रुपये खर्चून बसवलेल्या या स्वतंत्र यंत्रणेमुळे पाण्याचा पीएच किंवा क्षाराचे अवाजवी प्रमाण यांसारख्या समस्या त्यांच्याकडे दिसत नाहीत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com