1871 मधील हिप्परगा तलाव 22 वर्षांनी पहिल्यांदाच भरला ! ! बाळे, देगाव परिसरातील 100 कुटुंबांना सतर्कतेचा इशारा 

hipprga-talav-solapur_201910312532.jpg
hipprga-talav-solapur_201910312532.jpg

सोलापूर : शहरालगत असलेला हिप्परगा तलाव 94 टक्‍क्‍यांपर्यंत भरला असून उद्या (शनिवारी) तलाव 100 टक्‍के भरण्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. 1998 नंतर म्हणजेच तब्बल 22 वर्षांनंतर हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शहरातील भवानी पेठ वॉटर हाऊसला दररोज दहा एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे. तर उर्वरित पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. 


सोलापुकरांची विशेषत: जुन्या सोलापुरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी व परिसरातील कोरडवाहू शेतीला त्याचा लाभ व्हावा म्हणून ब्रिटीश सरकारच्या काळात 1868 मध्ये या तलावाचे बांधकाम सुरु झाले. तीन वर्षांनंतर 1871 मध्ये हिप्परगा तलावाची निर्मिती झाली. सततचा दुष्काळ अन्‌ कडक उन्हाचा चटका सहन करणाऱ्या सोलापुकरांना कालांतराने उन्हाळा असो की पावसाळा, पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. तलावाच्या निर्मितीनंतर थोडासा दिलासा मिळाला. मात्र, 1990 आणि 1998 नंतर यंदा हा तलाव भरल्याची माहिती शाखाधिकारी शिरीष जाधव यांनी "सकाळ'ला दिली. एकरुख उपसा सिंचन योजनेअंतर्गत कारंबा पंप हाऊसद्वारे वर्षभरात उजनी धरणातील तीन टीएमसी पाणी हिप्परगा तलावात सोडले जाते. त्यानंतर ते पाणी हगलूर व बोरामणी येथील पंप हाऊसद्वारे दर्गनहळ्ळी, दर्शनहळ्ळीमार्गे अक्‍कलकोट व दक्षिण सोलापुरातील 17 हजार हेक्‍टरसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याची पहिली चाचणी नुकतीच पार पडली असून आता यापुढे उजनीतून पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्यानुसार शेतकऱ्यांना पाणी सोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. 


हिप्परगा तलावासंबंधी ठळक बाबी... 

  • तलाव निर्मितीचा कालावधी 
  • 1868-71 
  • तलावाची साठवण क्षमता 
  • 3 टीएमसी (61.66 द.ल.घ.मी) 
  • शेतीसाठी दरवर्षी पाणीपुरवठा 
  • 3 टीएमसी 
  • शहरासाठी दरवर्षी पाणी 
  • 3,650 एमएलडी 
  • तलावातील सध्याचा साठा 
  • 57.11 द.ल.घ.मी 
  • तलावाचा परिसर 
  • 18.42 स्क्‍वेअर किलोमीटर 
  •  

तलाव पूर्ण भरल्यानंतर सांडव्यातून येईल पाणी 
हिप्परगा तलावातील पाणीसाठा वाढू लागला असून तलाव पूर्ण भरल्यानंतर सांडव्याद्वारे पाणी खाली सोडले जाणार आहे. त्यामुळे बाळे व देगाव परिसरातील सुमारे शंभर कुटुंबांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- पी. शिवशंकर, आयुक्‍त, महापालिका. 


"आडेला' नदीवर उभारला तलाव 
कृष्णा खोऱ्यातील भिमा नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अडेला नदीवर हिप्परगा तलाव उभारण्यात आला आहे. तुळजापूरहून ही नदी सोलापूर मार्गे पुढे जाते. मागील काही वर्षांत या नदीच्या पात्राचे रुपांतर ओढ्यात झाल्याचेही अधिकारी सांगतात. तामलवाडी परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी या तलावात येते. आतापर्यंत हा तलाव तीनवेळा भरला आहे. 1990 आणि 1998 मध्ये पडलेल्या पावसामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याची माहिती संबंधित शाखाधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com