सोलापूर जिल्ह्यातील शिवकालीन जाज्वल्य इतिहास प्रकाशझोतात 

history of chhatrapati shivaji maharaj period in Solapur district is in the spotlight
history of chhatrapati shivaji maharaj period in Solapur district is in the spotlight

माढा (जि. सोलापूर) : दुसऱ्या सुरत मोहिमेला जाण्याअगोदर स्वराज्याच्या पुणे-नगर सीमेवरील गावांतून रयतेला त्रास देणाऱ्या व स्वराज्यात येऊ पाहणाऱ्या मुगलांना सीमेबाहेर थोपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नर, कडा, अष्टी, श्रीगोंदा, माढा, बार्शी, परांडा इत्यादी तत्कालीन नगर जिल्ह्यात निजामशाहीत व मुघलशाहीत मोडणाऱ्या सीनाकाठच्या भागातील गावांत येऊन मुगल अधिकाऱ्यांना सीमापार लावले. नगर, परंडा भागातील औरंगजेबाच्या आखत्यारीतील 51 गावांतील शत्रूंना पराभूत केल्याचा उल्लेख औरंगजेबाच्या दरबारी कारकुनाच्या नोंदवहीत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज या भागात शके 1592 वैशाख वद्य चतुर्दशी अर्थात 8 मे 1670 मधे येऊन गेल्याने हा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याच्या घटनेला या वर्षी 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. एका कतब्यानुसार मंगळवेढा, पंढरपूर, तुळजापूर भागात महाराजांनी मोहीम केल्याचा दावा इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांनी केला आहे. तब्बल 350 वर्षांपूर्वीचा सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांचा शिवकालीन जाज्वल्य इतिहास प्रकाशझोतात आणला आहे. 
याबाबत इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांनी सांगितले की पुरंदरच्या तहात गेलेली संपत्ती व किल्ले परत मिळवण्यासाठी आखलेल्या दुसऱ्या सुरत मोहिमेवर जाण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुगलांना नियंत्रणात आणण्यासाठी जी योजना आखली त्यात माढा, बार्शी, परांडा हा नगर निजामशाहीत व मुघलशाहीत मोडणारा सीना व भीमाकाठचा सधन बागायत भागही समाविष्ट होता. हा भाग परांडा किल्ल्याच्या नियंत्रणात होता. माढा तालुक्‍याचे शिवकालीन नाव "माढे, माढं' असून या तालुक्‍यांवर शिवपूर्व बहामनी काळापासून कायमच सुलतानी सत्तेचे राज्य होते. सीना व भीमा नदीकाठ हा मुख्य खंडणीमुलूख होता. औरंगजेबाने या भागावर इ. स. 1657 मध्ये नासीरखान, इ. स. 1662 मधे सय्यद महमद खान यांना नेमून "जुन्नर, पांडे, श्रीगोंदा, अष्टी, कडा व परिंडा खालील मुलूख सांभाळून संधी मिळताच सीमा ओलांडून मराठ्यांचा मुलूख बेचीराख करून खेडी ओस करावी असा उल्लेख असलेले औरंगजेबाची हुकूमपत्रे उपलब्ध आहेत. यासाठी औरंगजेबाने दीड हजार जाठ, दीड हजार पायदळ, 20 तोफा, 500 बंदूकधारी सैन्य व अन्य सरदार, शिपाई परांडा किल्ल्यावर तैनात केले होते. हेच सैन्य परांडा, माढा आदी भागातून सीमा ओलांडून स्वराज्याच्या सीमेवरील नागरिकांना व गावांना त्रास देत असल्याच्या वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी गेल्यानंतर मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठीच महाराजांनी दुसरऱ्यांदा सुरत मोहिमेवर जाण्यापूर्वी मुगलांना सीमेबाहेर काढण्यासाठी अगोदर जुन्नर येथील कारतलब खानाला झोडपले व नगर येथील परांडा परगण्यातून, माढ्यातून व आसपासच्या क्षेत्रातून स्वराज्याच्या सरहद्दीत घुसखोरी करणारे अब्दुल मुनीम, नासीर खान, राव करणसिंह, सर्जाखान या मुगल अधिकाऱ्यांना महाराजांनी चांगलेच झोडपून काढल्याचा उल्लेख मुगल दरबारच्या एका फारसीतील तवारीखेच्या नोंदवहीत आहे. शके 1592 वैशाख वद्य चतुर्दशी (इ. स. 8 मे 1670) जुन्नर, नगर, परिंडा महालातील 51 गावांत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना शिकस्त दिल्याचा उल्लेख आहे. या नामावलीत "परांडे' महालातील मौजे "बार्सी' व मौजे "माढे' असा उल्लेख असून हा मूळ मजकूर औरंगजेबाच्या दरबारी कारकुनाच्या नोंदवहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या हल्ल्यातून मुगल सैन्याला शिकस्त दिली व माढा, बार्शीसह आसपासच्या 50-52 गावांतील रयतेचेही रक्षण केले. माढा तालुक्‍यात घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला 8 मे 2020 रोजी ठीक 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

मोहिमेत महाराजांसह स्वराज्याचे महापराक्रमी सेनानी व शिवरायांचे व्याही सेनापती कुडतोजी ऊर्फ प्रतापरावजी गुजर व अन्य मुत्सद्दी आनंदरावजी, निळोपंत आदी मराठेशाहीतील मातब्बर मंडळी उपस्थित होती. जून 1670 मधील एका कतब्यानुसार महाराजांनी मंगळवेढा, पंढरपूर, तुळजापूर आदी भागासह बादशाही व निजामशहीच्या मुख्य इलाख्यात मोहीम केली व पुढे जुलै 1670ला या भागातून परत जाऊन 2 ऑक्‍टोबर 1670 मधे कल्याण-भिवंडी-नाशिक खानदेश मार्गे सुरतेत गेले व सुरत मोहिमेनंतर आल्यामार्गे किल्ले रायगडावर परतले. या ऐतिहासिक घटनेत शिवछत्रपतींची पाऊले सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी तथा माढा तालुक्‍यात उमटल्याने या भागाचे शिवकाळातील ऐतिहासिक महत्त्व उजेडात येत असून समस्त जिल्ह्याने या घटनेतून प्रेरणा घेऊन हा वारसा जपण्याची गरज आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

असे केले संशोधन 
या ऐतिहासिक घटनेच्या संशोधनासाठी शिवकालीन इंग्रजांचे मुंबई व ठाणे दफ्तरातील फॅक्‍टरी रेकॉर्डस व इंग्रजांचे सुरत कन्सलटेशनचे पत्रव्यवहार, शिवकालीन बखरी व पत्रसंग्रह, मुगलांच्या अस्सल तवारिखा, औरंगजेबाची विविध फरमाने, मनसबदारी कागदपत्रे, हूकूमपत्रे अशा मोडीलीपी, मराठी, इंग्रजी व फारसी भाषांतील अस्सल साधने एकत्रित करून श्री. चव्हाण यांनी या घटनेचे संशोधन केलेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com