पुणे पदवीधर, शिक्षकच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार विजयकुमार देशमुखांचा होम टू होम प्रचार 

प्रमोद बोडके
Saturday, 28 November 2020

सहस्त्रार्जून प्रशालेत बैठक 
उमा नगरी येथील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या नंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी श्रीशैल नगर येथील श्री सहस्त्रार्जुन प्रशालेचे भेट देऊन तेथील शिक्षकांची बैठक घेतली. या बैठकीस संस्थेचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर, सेक्रेटरी अनिल रंगरेज, गुलाबचंद बारड, प्रा. भगवंत उमदीकर, महेश मेंगजी, गणेश चवटे, बलभिम कोल्हापुरे, यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. यावेळी आमदार देशमुख यांनी पदवीधर व शिक्षक मतदारांनी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रथम पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले. 

सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या अनुषंगाने माजी पालकमंत्री तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरातील विविध भागात पदवीधर आणि शिक्षकांच्या भेटी गाठी सुरु केल्या आहेत. या निवडणुकीतील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रथम पसंतीचे मत देऊन भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

या प्रचार दौऱ्याची सुरुवात उमा नगरी येथून झाली. यावेळी नगरसेवक शिवानंद पाटील, शहर उत्तर पश्‍चिम मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी, मंडळ सरचिटणीस जगू अळ्ळीमार, महिला मोर्चा सरचिटणीस डॉ. प्राची हुलसुरकर, विपूल दळवी, सुनंदा बिराजदार, दत्तू पोसा, विजयालक्ष्मी एडके, सुचित चौगुले, ईश्वर हिरेमठ, वाय. पी. कांबळे उपस्थित होते.

आमदार देशमुख म्हणाले, गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्‍नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी सर्व शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रथम पसंतीचे मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावे. आमदार देशमुख यांनी उमा नगरी मधील प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home to home campaign of MLA Vijaykumar Deshmukh for Pune Graduate, Teacher Candidate Campaign