काम पुण्यातील कंपनीत; सोलापुरातून होतोय यूके, यूएसीएतील सहकाऱ्यांशी संवाद

श्रीनिवास दुध्याल
Saturday, 25 April 2020

आयटी कर्मचारी सुभाष चौगुले म्हणतात, मी पुणे येथील आयटी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. लॉकडाउनच्या एक आठवडा आधीपासूनच कंपनीने आम्हाला वर्क फ्रॉम होम करायला सांगितल्यामुळे सध्या सोलापुरात येऊन घरूनच काम करत आहे. सध्या ऑफिसचे नियमित डेटा लोड करणे सुरू आहे.

सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सध्या सोलापूर शहरातून मोठ्या शहरांमध्ये आयटी, मेकॅनिकल डिझाइनर, मेडिकल रिप्रेझेन्टर, फायनान्स ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह आदी आपल्या मूळ शहरात परतले असून, त्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. यामुळे त्यांना स्वगृही राहून कंपनीचे व स्वहित साधता येत आहे... अशा काही वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची मनोगते...
येथील आयटी कर्मचारी सुभाष चौगुले म्हणतात, मी पुणे येथील आयटी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. लॉकडाउनच्या एक आठवडा आधीपासूनच कंपनीने आम्हाला वर्क फ्रॉम होम करायला सांगितल्यामुळे सध्या सोलापुरात येऊन घरूनच काम करत आहे. सध्या ऑफिसचे नियमित डेटा लोड करणे सुरू आहे. इतर शहरातील सहकाऱ्यांशी व यूके, यूएसीए येथील सहकार्‍यांशी व्हिडिओ व ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा, सल्लामसलत करून विविध प्रोजेक्टवर काम सुरू आहे.
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह चंद्रकांत जाधव म्हणतात, पुणे येथील एका कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी एक आठवडा अगोदर कंपनीने ऑनलाईन वर्क फ्रॉम होम करण्याची अनुमती दिल्यामुळे आपल्या मूळगावी सोलापूरला आलो आहे. घरात बसून कंपनी झूम ॲपवर कॉन्फरन्सवर काम सुरू आहे. व्हिडीओ कॉलिंग करून डॉक्टरांना आपल्या मेडिकल प्रोडक्टबद्दल माहिती देत आहे. यामुळे स्किल डेव्हलपमेंटसह डॉक्टरांशी बोलण्याविषयीचे ज्ञान मिळत आहे. तसेच ऑनलाइन मेडिकल अपडेट घेत आहे.
पुणे येथील इन्फोसिस कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करणारे लक्ष्मीकांत चिंताकिंदी म्हणतात, पुण्यातील इन्फोसिस कंपनीत सिस्टीम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी एक आठवडा अगोदर कंपनीने वर्क फ्रॉम होम करण्याची संधी दिली. त्यामुळे सोलापूरला आलो आहे. सध्या घरातून नेटवर्किंगच्या माध्यमातून इतर कंपन्यांचे इंटरनेट सर्व्हिस मॅनेज करणे, ऑनलाईन टूलवरून कॉम्प्युटर मॉनिटरिंग करतो. लॅपटॉपवरून कंपनीचे काम सुरू आहे.
मेकॅनिकल डिझाइनर हरिकृष्ण गुर्र्म म्हणतात, पुण्यातील एक कंपनीत डिझाईन इंजिनिअर आहे. लॉकडाउनच्या अगोदर 18 मार्चपासून सोलापुरात असून, घरबसल्या डिझाईन, कॅल्क्युलेशन ड्रॉईंग, थ्रीडी मॉडेल आदी कामे ऑनलाईन करत आहे. या कामासाठी वर्कस्टेशनची गरज असते पण लॉकडाउनमुळे सध्या वर्क फ्रॉम होम नाईलाज असल्यामुळे, लॅपटॉपवरून ऑनलाईन ही कामे सुरू आहेत.
फायनान्स ऑपरेशन एक्झिक्यूटिव्ह प्रवीण गुजर म्हणतात, पुणे येथे बँक ऑफ न्यूयॉर्क कंपनीत कार्यरत आहे. सध्या सोलापुरात वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. घरात बसून शेअर्स सेटलमेंट करत आहे.  इंटरनेट स्लो असल्यामुळे कार्यालयात नऊ तासात होणारे काम घरात बसून दहा तासात होत आहे. शेअर्स सेटलमेंटवरून वर्क परफॉर्मन्स ठरत असते. त्यामुळे रोज दहा सेटलमेंट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home from work has started from Solapur