मारुती चित्तमपल्ली यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करा : कॉ.आडम मास्तर यांची मागणी 

Maruti Chittam Palli with adam mastar.jpeg
Maruti Chittam Palli with adam mastar.jpeg

सोलापूर  : निसर्गाचे गाढे अभ्यासक, संशोधक व साहित्यिक, अरण्यऋषी, कर्मयोगी मारुती चित्तमपल्ली यांचे जन्मदिन 5 नोव्हेंबर रोजी सोलापूरात उत्साहात साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी 7 नोव्हेंबर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचा सुवर्ण महोत्सव आणि कामगार क्रांती दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी शनिवारी सांयकाळी सदिच्छा भेट घेतली. या दरम्यान, काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिलखुलास गप्पा मारल्या. 

ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांनी मराठी साहित्यविश्वात 1 लाख नव्या शब्दांची जी भर घातली ती भर आजवरच्या मराठी साहित्य विश्वात सर्वात मोठी अभिनव क्रांती समजण्यात यावी. निसर्ग आणि निसर्गाशी निगडीत सर्व समावेश घटकांवर सहज आकलन होईल, असे समृद्ध लेखनाचा विक्रम मारुती चित्तमपल्ली यांचा नावे आहे. जल ,जंगल, जमीन ही आदिवासी बांधवांसाठी निसर्गदत्त देणगी आणि वडिलोपार्जित संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आहे. मात्र, यामुळे निसर्गाचे समतोल कायम राहील. यासाठी स्वतः वन संवर्धन चळवळीत अव्याहतपणे आजही कृतिशील आहेत. अर्थातच हे अभिनव व अभूतपूर्व विशेष निसर्ग संशोधन त्यांनी केलेला आहे. यांचा गौरव पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावा. यासाठी भारत सरकारकडे मागणी केली. 

मारुती चित्तमपल्ली यांचे कार्य आणि लेखन बाबत नमूद करताना आडम म्हणाले की, मारुती चितमपल्ली यांनी अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलुगु भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.चितमपल्ली यांनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे. जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे. चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे, ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत) ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी) चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्ली यांच्यामुळे नागरी वाचकांस माहित झाले. 

संशोधन आणि संस्थांमधील सहभाग व संपादन कार्य नवोदितांना आदर्श आणि अनुकरणीय आहे. कारण अरण्यऋषी आदरणीय मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते. 
मराठी साहित्य विश्वात विशिष्ट विषयावर विशेष लेखन करून ग्रंथसंपदा दिले. 

मारुती चित्तमपल्ली यांची साहित्य संपदा 
आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी), 
आपल्या भारतातील साप 
केशराचा पाऊस 
घरट्यापलीकडे, 
चकवाचांदण : एक वनोपनिषद, (आत्मचरित्र) 
चित्रग्रीव - एका कबुतराची कथा 
चैत्रपालवी, 
जंगलाचं देणं, (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-) 
जंगलाची दुनिया 
नवेगावबांधचे दिवस 
निळावंती, 
निसर्गवाचन 
पक्षिकोश, 
पक्षी जाय दिगंतरा, 
मृगपक्षिशास्त्र, 
रातवा, (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार) 
रानवाटा, (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-), (मृण्मयी साहित्य पुरस्कार) 
शब्दांचं धन, 
सुवर्णगरुड, 

मारुती चितमपल्लींना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने चितमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले. पश्‍चिम महाराष्ट्रात काही वर्षे नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट येथली जंगले अनुभवली. मात्र त्यांना नवेगाव बांधचे जंगल अधिक आवडले. शिकारासाठी येणारे माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिकले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितमपल्लींना शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली. 

आगामी काळात मत्स्यकोश, वनायुर्वेद कोश या व अन्य महत्वाचे कोशाची भर पडणार आहे. एकंदरीत त्यांनी दिलेल्या आदिवासी समाजाचे पारंपरिक जीवनविधान, संस्कृती,भाषा संवर्धन आदींसह सांस्कृतिक, सामाजिक, नैसर्गिक आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांचा भारत सरकारने त्यांना मानाचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविद, राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल पाठवण्यात आले. 
तसेच सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व पदाधिकारी, सन्मानीय सदस्य व महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सोलापूरचे भूमीपुत्र अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना मानपत्र देऊन त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याबाबत सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर करून केंद्र आणि राज्य सरकारला शिफारस पाठवावी, अशी मागणी करत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com