"कोरोना'च्या दहशतीत "ती' उतरलीया रस्त्यावर 

सुस्मिता वडतिले 
बुधवार, 25 मार्च 2020

सोलापुरात मंगळवारी सकाळपासून चौकाचौकांत पोलिसांची पथके तैनात होती. त्यातून अत्यावश्‍यक वाहनांनाच प्रवेश दिला जात होता. त्यात मजरेवाडी येथील पानघंटे या रिक्षाने रुग्णांना रुग्णालयापर्यंत व तेथून पुन्हा घरी सोडत आहेत. सोलापुरात शोभा घंटे आणि अंबिका पानघंटे या दोन रिक्षाचालक महिला आहेत.

सोलापूर : जगभर धुमाकूळ घालत असलेल्या "कोरोना'ला रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अपवाद वगळता खासगी वाहनांनाही बंदी आहे. सोलापुरात एकही रुग्ण नाही आणि तो येऊच नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अशा स्थितीत मजरेवाडी येथील 34 वर्षांच्या एक ताई रिक्षा घेऊन रुग्णांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. अंबिका पानघंटे असे त्यांचे नाव आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या सेवेत हजर असतात. 
सोलापुरात मंगळवारी सकाळपासून चौकाचौकांत पोलिसांची पथके तैनात होती. त्यातून अत्यावश्‍यक वाहनांनाच प्रवेश दिला जात होता. त्यात मजरेवाडी येथील पानघंटे या रिक्षाने रुग्णांना रुग्णालयापर्यंत व तेथून पुन्हा घरी सोडत आहेत. सोलापुरात शोभा घंटे आणि अंबिका पानघंटे या दोन रिक्षाचालक महिला आहेत. पानघंटे या मजरेवाडीतील बेघर वसाहत झोपडपट्टीत राहतात. त्यांनी डिसेंबर 2019 मध्ये रिक्षा घेतली. त्यांच्या पतीचे लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी निधन झाले. त्यानंतर घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांना एक मुलगी आहे. तिने यंदा बारावीची परीक्षा दिली आहे. तिच्या शिक्षणासाठी जमा केलेल्या पैशातून त्यांनी रिक्षा घेतली. त्यातून त्यांची उपजीविका सुरू आहे. त्यांची मुलगी नेहाला हैदराबाद येथे शिक्षणासाठी पाठवायचे आहे. त्यासाठी त्या झटत आहेत. 
रुग्णांना सेवा देण्याचे सुरवातीला त्यांनी काम केले. त्यातून मुलीच्या शिक्षणासाठी काही पैसे जमा केले. पुढे त्यांना एका रुग्णालयात कॅन्टीनमध्ये काम मिळाले. त्यात त्यांचे मन रमेना. स्वत: काहीतरी करायला हवं, असं वाटत होते. त्यातच रिक्षा चालवण्याची कल्पना सुचली. त्यानुसार रिक्षा चालवायला शिकल्या. सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरात रिक्षाचालकांना परवाना देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले. त्यात त्यांचे नाव आले आणि लगेच रिक्षा घेण्याचे नियोजन केले. 

मुलीसोबत दहावीची परीक्षा 
मुलीसोबत म्हणजे नेहासोबत त्यांनी 2018 ला खास रिक्षासाठी दहावीची परीक्षा दिली. त्यात त्या 60 टक्‍क्‍यांनी उत्तीर्ण झाल्या. पानघंटे या रिक्षा चालवताना शहरातील शेळगी, बाळे, एसटी स्थानक, रेल्वे स्टेशन, नई जिंदगी, सम्राट चौक, बाळीवेस, मधला मारुती आदी भागांत रिक्षा चालवतात. सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत शहरातील भागात रिक्षा चालवतात. रिक्षा प्रवाशांना स्वखुशीने रिक्षाभाडे द्या असे पानघंटे आवर्जून सांगतात. त्यांचा दिवसभरात 150-200 किमी प्रवास सुरू असतो. महिला रिक्षाचालक असल्यामुळे सर्वजण सहकार्य करतात, असे "सकाळ'शी बोलताना त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the horror of Corona she down the road