ऑक्‍सिजनअभावी सोलापुरातील रुग्णालये व्हेंटीलेटरवर; पुरवठ्याअभावी 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढले दर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

इतर रुग्णाला दोन तर कोरोनाग्रस्ताला 70 लिटर ऑक्‍सिजनची गरज 
सोलापुरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने विजयपूर, गुलबर्गा, बीदर, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी सोलापुरात येऊ लागले आहेत. या वाढीव भारामुळे रुग्णालयातील उपलब्ध ऑक्‍सिजन कमी पडू लागले. मार्चपूर्वी सोलापुरातील खासगी रुग्णालयात महिन्याला आठ टॅंकर ऑक्‍सिजनचा पुरवठा होत होता. मेनंतर ही गरज 30 टॅंकरच्या पुढे गेली आहे. 22 मे नंतर ऑक्‍सिजनची मागणी प्रचंड वाढली. अन्य आजारातील रुग्णांना एक ते दोन लिटर ऑक्‍सिजन लागते. तर कोरोनाच्या रुग्णासाठी 70 लिटरपर्यंत लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, मार्चपूर्वी 13 हजार किलोचा ऑक्‍सिजन महिनाभर पुरत होता. मात्र, आता पाच दिवसात तेवढा साठा संपू लागल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले यांनी सांगितले. 

सोलापूर : कोरोनाने त्रस्त झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्‍सिजनची मागणीही वाढली आहे. पुणे, कर्नाटकातून सोलापुरात येणारे ऑक्‍सिजनचा घटल्याने खासगी रुग्णालयांची डोकेदुखी वाढली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी झाल्याने ऑक्‍सिजनचे दर 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. तर दुसरीकडे सोलापुरात ऑक्‍सिजनचा तुटवडा नसल्याचे सांगत टेंभूर्णीत तीन नव्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 
12 एप्रिलला पहिला रुग्ण सोलापुरात आढळला. सध्या रुग्णसंख्या 18 हजार 881, मृतांची संख्या 769 वर पोहोचली आहे. कोरोना, सारी व न्यूमोनियाची रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापुरात खासगी रुग्णालयांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करणारे सहा कंत्राटदार आहेत. त्यांच्याकडे सातत्याने मागणी वाढू लागली आहे. शासकीय यंत्रणांकडून ऑक्‍सिजन पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीत पाच वरिष्ठ अधिकारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न असले तरी अन्य अधिकाऱ्यांनी मात्र या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाकडून होत आहे. सोलापुरातील खासगी रुग्णालयांना ऑक्‍सिजनचा पुरवठा पुणे व कर्नाटकातून होतो. कर्नाटक सरकारने तेथील वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून ऑक्‍सिजनचा अन्य राज्यातील पुरवठा थांबविला. पुण्यातही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने सोलापूरला येणाऱ्या ऑक्‍सिजनचा मार्ग ठप्प झाल्याचे ऑक्‍सिजनचा पुरवठा करणारे प्रमोद तमन्नवार यांनी सांगितले. 

पुण्याहून अतिरिक्‍त साठा मागणी 
कर्नाटक व पुण्याहून सोलापुरसाठी ऑक्‍सिजन येते. कर्नाटकची रुग्णसंख्या वाढल्याने तेथून होणारा पुरवठा कमी झाला आहे. पुण्याहून अतिरिक्‍त साठा मागणी केला आहे. टेंभूर्णी येथील प्लॅंटला परवानगी मिळाली असून त्याठिकाणी ऑक्‍सिजन निर्मिती होईल. शहर-जिल्ह्यातील रुग्णालयांतील 30 हून अधिक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होतात. त्यांच्याकडून ऑक्‍सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. 
- डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक 

मागणीप्रमाणे पुरवठा नसल्याने अडचणी 
कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी ऑक्‍सिजनचा मागणी तसा पुरवठा होत होता. कोरोनामुळे ऑक्‍सिजनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या ऑक्‍सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. प्रशासन पातळीवर समिती नेमून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. तरीही मागणीप्रमाणे पुरवठा नसल्याने अडचणीत वाढ होत आहे. 
- डॉ. माणिक गुर्रम, चेअरमन, मार्कंडेय सहकारी रुग्णालय 

दुकान बंद करून बसलो 
मेपर्यंत ऑक्‍सिजनचा मागणी तसा पुरवठा होता. परंतु सोलापूरकरांना कोरोनाने वेढल्यानंतर मागणीप्रमाणे ऑक्‍सिजनचा पुरवठा होत नाही. पुणे व कर्नाटकातून ऑक्‍सिजन येणे कमी झाले आहे. अपेक्षित पुरवठ्याअभावी गेल्या काही दिवसांपासून दुकान बंद करून बसलो आहे. 
- प्रमोद तमन्नवार, ऑक्‍सिजन वितरक 

पाठपुरावा सुरू 
सोलापुरातील ऑक्‍सिजनची मागणी वाढली असली तरी प्रशासन पातळीवर तो विनाखंड मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यात यश येत आहे. टेंभूर्णी येथे नव्याने तीन प्लॅंटला मंजुरी देण्यात आली आहे. ऑक्‍सिजनची अडचण येणार नाही. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर 

रूग्णालयांवरील ताण वाढला 
सोलापुरात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ते सर्वजण उपचारासाठी सोलापुरात येतात. त्यामुळे रुग्णालयावरील ताण वाढत आहे. तातडीने ऑक्‍सिजनची उपलब्धता होण्याची गरज आहे. 
- संजय रघोजी, नागरिक 

"ऑक्‍सिजन'वर जिल्हाधिकाऱ्यांचा ताबा... 

  • परराज्यातील पुरवठा बंद, सोलापुरातील ऑक्‍सिजन वापरणार सोलापुरातच 
  • ऑक्‍सिजन निर्मिती व साठा करणाऱ्या तीन कंपन्या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या अधिग्रहित 
  • अर्निकेम इंडस्ट्रीज, एल. आर. इंडस्ट्रिज, एस. एस. बॅग्ज व फिल्टर्स या तीन कंपन्यांचा समावेश 
  • सोलापुरातील ऑक्‍सिजन इतर जिल्ह्यात पाठविण्यासाठी पूर्व परवानगी आवश्‍यक 
  • औद्योगिक कारणासाठी ऑक्‍सिजन बंद 
  • उत्पादक पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची सूचना 
  • कोविड संसर्गापूर्वीचेच ऑक्‍सिजन दर राहणार कायम 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospitals in Solapur on ventilators due to lack of oxygen rates increased by 25 to 30 per cent due to lack of supply