esakal | एकाच जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिकांच्या सवलतीत प्रशासनाकडून होतोय दुजाभाव 

बोलून बातमी शोधा

food delivery

सध्या सर्वांच्या समोर कोरोनाचे प्रमुख संकट आहे. हे संकट संपविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक शासनासोबत उभा आहे. कोरोनाला हद्दपार करत असतानाच या भागातील उद्योग, व्यवसाय टिकावेत. या उद्योग, व्यवसायावर अवलंबून रोजीरोटी टिकून राहावी, यासाठी देखील प्रयत्न आवश्‍यक आहेत. शासनाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागाला समान सवलती मिळाव्यात. शहरी भागात ज्याप्रमाणे पार्सल/होम डिलिव्हरीला रात्री नऊपर्यंत परवानगी देण्यात आली आहे, त्याप्रमाणेच ग्रामीण भागालाही रात्री नऊपर्यंत परवानगी मिळावी. 
- इंद्रजित पवार, हॉटेल इंद्रप्रस्थ 

एकाच जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिकांच्या सवलतीत प्रशासनाकडून होतोय दुजाभाव 
sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या हॉटेल/ रेस्टॉरंट यांना होम डिलिव्हरी/पार्सलसाठी सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. महापालिका हद्द वगळून उर्वरित ग्रामीण भागातील हॉटेल/रेस्टॉरंट यांना होम डिलिव्हरी/पार्सल देण्याबाबत 31 मेच्या आदेशात स्पष्ट उल्लेख नाही. ग्रामीण भागात सकाळी 9 ते 5 या वेळेत हॉटेल/रेस्टॉरंट होम डिलिव्हरी/पार्सल सुविधा देत आहेत. एकाच जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत प्रशासनाकडून दुजाभाव होत असल्याची बाब समोर आली आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारच्यावतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाउन कालावधीत बंद असलेले उद्योग/व्यवसाय पुन्हा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी 31 मे रोजी याबाबत घेतलेल्या आदेशानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील उद्योग/व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना एकच सवलत द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे. 

सोलापूर महापालिका आयुक्तांनी 31 मे रोजी काढलेल्या आदेशाचे स्पष्टीकरण 17 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या स्पष्टीकरणानुसार सोलापूर महापालिका हद्दीतील हॉटेल/रेस्टॉरंट यांना सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. आवश्‍यकता असल्यास रविवारीही हॉटेल/व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर महापालिका हद्दीत चहा व्यवसाय करणाऱ्या दुकानांना काउंटर सेल करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. चहा व्यावसायिकांना देखील केवळ होम डिलिव्हरीसाठी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत परवानगी देण्यात आली असल्याचे महापालिका उपायुक्त अजयसिंह पवार यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. 

आवश्‍यकता असल्यास सुधारणा आदेश
शासनाने दिलेल्या सूचनेनुसार हे आदेश काढण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील होम डिलिव्हरी/पार्सलबाबत शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्‍यकता असल्यास सुधारणा आदेश काढण्यात येतील. महापालिकेने काय आदेश काढले आहेत. त्याचीही माहिती घेतली जाईल. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर