कामती येथील टायर रिमोल्डिंग कंपनीला भीषण आग; एक कोटीचे नुकसान

श्रावण तीर्थे 
Monday, 26 October 2020

कामती (ता. मोहोळ) येथे कामती - कुरुल रोडवर कामतीपासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जावेद सय्यद (रा. कामती) यांच्या तवक्कल टायर वर्क्‍स या टायर रिमोल्डिंग कंपनीला सोमवारी (ता. 26) सायंकाळी पाच वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. 

कोरवली (सोलापूर) : कामती (ता. मोहोळ) येथे कामती - कुरुल रोडवर कामतीपासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जावेद सय्यद (रा. कामती) यांच्या तवक्कल टायर वर्क्‍स या टायर रिमोल्डिंग कंपनीला सोमवारी (ता. 26) सायंकाळी पाच वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. 

कंपनीमध्ये जुने व नवीन टायर व सुलोचन हा ज्वलनशील पदार्थ असल्याने आग लागल्यानंतर आगीने खूप मोठा भडका घेतला. तेव्हा शेजारील वस्तीवरील विकास शिंगाडे यांनी कामती पोलिस स्टेशनला माहिती दिली, तेव्हा कामती पोलिसांनी सोलापूर महानगरपालिका येथील अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाची गाडी तब्बल दोन तास उशिराने दाखल झाल्यानंतर अग्निशामक दल व कामती पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. 

तत्पूर्वी कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या पाण्याचे टॅंकर मागवून व जेसीबी बोलावून बाहेर ठेवलेले टायर हटवण्याचा प्रयत्न केला; पण आग खूप भीषण असल्यामुळे कंपनीतील सर्व मशिनरी व टायर जळून खाक झाले. सुमारे एक कोटीचे नुकसान झाले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

ही टायर कंपनी रस्त्याच्या कडेला असल्यामुळे रस्त्याने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या खूप मोठ्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. जर अग्निशामक दलाची गाडी लवकर आली असती तर आग विझविण्यात यश आले असते आणि खूप मोठे नुकसान टाळता आले असते. कामती पोलिस स्टेशनला एका अग्निशामक दलाची गाडी असावी. त्यामुळे अशा आगीच्या घटना टाळता येतील, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले यांनी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A huge fire broke out at a tyre remolding company in Kamati