esakal | इच्छाशक्तीच्या जोरावर चोपडीतील शंभर वर्षांच्या आजीबाईने केली घरातूनच कोरोनावर मात !
sakal

बोलून बातमी शोधा

Aajibai

चोपडी (ता. सांगोला) येथील एका आजीबाईचे वय शंभर आहे. तिच्या संपूर्ण परिवारात जवळपास शंभरच्या आसपास लोक आहेत. थोडासा त्रास होऊ लागल्यानंतर तिची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनाच आजीबाईबाबत चिंता वाटू लागली. परंतु, या आजीबाईने सगळ्यांची चिंता केवळ पंधरा दिवसांत मिटवली आणि आजी ठणठणीत बरी झाली. 

इच्छाशक्तीच्या जोरावर चोपडीतील शंभर वर्षांच्या आजीबाईने केली घरातूनच कोरोनावर मात !

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : चोपडी (ता. सांगोला) येथील एका आजीबाईचे वय शंभर आहे. तिला नातू परतवंड आणि खापरतोंड आलेले आहेत. तिच्या संपूर्ण परिवारात जवळपास शंभरच्या आसपास लोक आहेत. थोडासा त्रास होऊ लागल्यानंतर तिची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनाच आजीबाईबाबत चिंता वाटू लागली. परंतु, या आजीबाईने सगळ्यांची चिंता केवळ पंधरा दिवसांत मिटवली आणि आजी ठणठणीत बरी झाली. आजाराला न भीता इच्छाशक्तीच्या जोरावर व कुटुंबातील सदस्यांनी घेतलेल्या काळजीमुळे आजीबाईंनी कोरोनासारख्या रोगावर विजय मिळविला. 

सखूबाई तुकाराम यादव (वय 100) या आजीबाईने कोरोनावर यशस्वीपणे मात करत अनेकांसाठी स्फूर्ती दिली आहे. 17 ऑक्‍टोबर रोजी नाझरा (ता. सांगोला) येथे सखूबाई यादव यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. वय वर्षे शंभर असल्यामुळे आजीबाईबाबत सर्वांनाच चिंता वाटत होती. त्या आजीबाईंना सांगोला येथील सांगोला आयसीयूमध्ये आणण्यात आले. या वेळी डॉ. बाबर व डॉ. येलपले यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार करण्यात आला. परंतु दवाखान्यात आजीबाई थांबायलाच तयार नसल्याने त्यांना घरी आणण्यात आले. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार व चोपडी गावचे आरोग्य सेवक डॉ. रामहरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घरीच आजीबाईच्या परिवाराने त्यांची काळजी घेतली. यातून त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. 

ग्रे फ्रूटमध्ये सी व्हिटॅमिन 59 टक्के असल्यामुळे सातत्याने त्यांना ग्रे फ्रूटचा ज्यूस देण्यात आला. त्यातून त्यांची प्रकृती उत्तम झाल्याचा अनुभव यादव यांनी व्यक्त केला. 2 नोव्हेंबर रोजी त्यांची कोरोनाची पुन्हा टेस्ट करण्यात आली. त्या वेळी ती टेस्ट निगेटिव्ह आली. केवळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आणि परिवाराने घेतलेल्या काळजीने सखूबाई तुकाराम यादव या हातात काठी घेऊन घराच्या परिसरात फिरू लागल्या. त्यामुळे कोरोनासारख्या रोगाला न भीता केवळ धैर्यानं या रोगाचा सामना करावा, हा संदेश आजीबाईंच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल