सोलापुरात स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात 

सोलापुरात स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात 

सोलापूर ः सिद्धेश्‍वर महाराजांची गड्डा यात्रा शेवटच्या टप्प्याकडे झुकत आहे. यात्रेच्यानिमित्ताने होम मैदानावर अनेक स्टॉल्स उभारण्यात आले. यात्रेसाठी होम मैदानावर मोठ्या प्रमाणात लोक येतात. त्यामुळे साहजिकच मैदान अस्वच्छ होते. त्यामुळे आज सकाळी मैदानाची स्वच्छता करण्यासाठी शेकडो हात सरसावले होते. त्या हातांनी मैदानाची स्वच्छता केली. निमित्त होते, "सकाळ'च्या स्वच्छता मोहिमेचे. 

मागील पाच वर्षांपासून "सकाळ'च्यावतीने होम मैदानाची स्वच्छता करण्याचा सामाजिक उपक्रम राबविला जातो. "सकाळ'च्यावतीने सोलापूरकर, विविध संस्था, शाळा, महाविद्यालये व संघटनांना स्वच्छतेच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आज शेकडो सोलापूरकर या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाली. सकाळच्या गुलाबी थंडीतही होम मैदानाची स्वच्छता करण्यासाठी आबालवृद्ध सहभागी झाले होते. नर्सरी स्कूलमधील छोटी मुलेही या स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. सकाळी पावणेनऊच्या सुमारास होम मैदानावर ही स्वच्छता मोहीम सुरू झाली. या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या संस्था, संघटना व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एक तासभर मैदानाची स्वच्छता केली. यामध्ये सोलापूर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सहभागही महत्त्वाचा होता. 

"सकाळ'च्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्वच्छता मोहीम ही फक्त मोहीमच नव्हती तर स्वच्छतेविषयी लोकांचे प्रबोधन व्हावे, हाही हेतू त्यामागे होता. स्वच्छता मोहीम सुरू होण्यापूर्वी चाइल्ड लाइनच्यावतीने सादर करण्यात आलेले पथनाट्य स्वच्छतेविषयी प्रबोधन करणारे होते. त्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. शासकीय योजनांचा उपयोग कशापद्धतीने केला जातो, हे त्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून दाखवून दिले. 
स्वच्छता करताना मैदानावर पडलेले प्लास्टिक, हे चिंतेचा विषय बनले आहे. शासनाने अनेक महिन्यांपूर्वी राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. मात्र, अद्यापही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे होम मैदानावर स्वच्छता करताना दिसून आले. शासकीय यंत्रणांनी प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध लादण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com