
ठळक बाबी...
सोलापूर : शहर- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी सुधारित आदेश काढले. त्यानुसार शहर व ग्रामीण पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे. मात्र, सर्वच ठिकाणी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुसरीकडे नागरिकांनाही स्वयंशिस्त नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर 28 फेब्रुवारीनंतर आज पुन्हा एकदा शहर-जिल्ह्यात शंभरहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
ठळक बाबी...
कोरोनाची लक्षणे असलेल्यांनी वेळेतच उपचार घ्यावेत, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत विलंबाने उपचारासाठी दाखल झाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय राहिली आहे. आज (बुधवारी) कुरुल येथील 48 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ते 26 फेब्रुवारीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउनची वेळ येऊ नये म्हणून नागरिकांनी नियमांचे पालन तंतोतंत करायला हवे. मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांचा दंडही वाढविण्यात आला आहे. तर प्रवासी वाहनांची दररोज पोलिसांनी तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, तसे होताना बहुतांश ठिकाणी दिसत नसून तीनचाकीत सहापेक्षा जास्त तर चारचाकीत शक्यतो पाचहून अधिक व्यक्ती दिसत आहेत. नियमांचे उल्लंघन वाढत असल्यानेच रुग्णसंख्या वाढत असल्याची चर्चा असून आता प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करीत नियमांचे काटेकोर पालन करणे हाच कोरोनाला रोखण्याचा उत्तम उपाय ठरू शकतो, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे.
शहरात येथे आढळले नवे रुग्ण
शहरात आज विना रेसिडेन्सी (बाळे), अण्णा कॉलनी (सैफूल), नेहरु सोसायटी (दमाणी नगर), विष्णूपुरी चाळ, रुबी नगर, अक्षय सोसायटी, आदित्य नगर, रचना सोसायटी (जुळे सोलापूर), रविवार पेठ, मंत्री चंडक, अशोक नगर (विजयपूर रोड), शेळगी गावठाण, उत्तर सदर बझार, मुलींचे वसतीगृह (होटगी रोड), मोदीखाना, श्रीशैल नगर (भवानी पेठ), होटगी रोड, शुक्रवार पेठ, बेगम पेठ, गुरुनानक नगर, अभिमानश्री नगर (मुरारजी पेठ), शिवाजी नगर, मार्कंडेय नगर (कुमठा नाका), प्रतिक नगर (जुना पुना नाका), अवंती नगर, रेल्वे लाईन्स आणि स्वामी विवेकानंद नगर या ठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत.