
सोलापूर : कोरोना महामारीपूर्वी सोलापूर विभागातून एकूण 85 रेल्वेगाड्या धावत होत्या. मात्र सध्या 60 गाड्या सुरू असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या बंद असल्याने सोलापूरकरांची दमछाक होत आहे. त्यामुळे अन्य गाड्या केव्हा सुरू होणार, याची सोलापूरकरांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. प्रवासासाठी सोयीस्कर असलेल्या हुतात्मा, इंद्रायणी, मिरज एक्स्प्रेस अद्यापही बंदच आहेत.
कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प होते. याचा फटका प्रवासी वाहनांबरोबरच रेल्वेलाही बसला आहे. रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या कोव्हिड स्पेशल म्हणून सुरू असलेल्या प्रवासी रेल्वे गाड्यांमधून भाडे जास्त आकारले जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. सोलापूरमधून पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांना एक प्रकारे दिलासा मिळत होता. मात्र पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे पॅसेंजरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे देखील प्रवाशांनी सांगितले.
पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनांचे प्रवासी दर जास्त असल्याने सामान्य व्यक्तींना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे हुतात्मा, इंद्रायणी, मिरज एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा करावी लागत असून, आणखी काही दिवस तरी प्रवाशांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असताना प्रशासनाने नियम व अटी लागू करत प्रवासी वाहने सुरू केली. रेल्वे विभागाने स्पेशल गाड्या सुरू केल्या. कोरोना महामारीपूर्वी सोलापूर रेल्वे स्थानकावरून 85 प्रवासी रेल्वे गाड्या धावत होत्या. सध्या 60 गाड्या सुरू आहेत. यामध्ये सोलापूर विभागातून कोरोनापूर्वी हुतात्मा, इंद्रायणी, मिरज एक्स्प्रेस या गाड्या धावत होत्या. मात्र सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही एकच गाडी सुरू आहे. अन्य गाड्या सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत असल्याने प्रवाशांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंद होती. त्यामुळे अनलॉकच्या टप्प्यात कोव्हिड स्पेशल गाड्या सुरू आहेत. हळूहळू रेल्वे सुरू होत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगला आहे. राज्य सरकार आणि रेल्वे मुख्यालयाकडून इतर गाड्या सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे अन्य गाड्या केव्हा सुरू होतील, याची माहिती आम्हाला नाही. सिद्धेश्वर एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
रेल्वे प्रशासनाने अनलॉकच्या टप्प्यात कोव्हिड स्पेशल नावाने गाड्या सुरू केल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील माढा आणि सोलापूर येथील खासदारांनी रेल्वे बोर्डाकडे गाड्या सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या सुरू झाल्या, तर प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
- संजय पाटील,
रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर
रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या काळात विशेष रेल्वे गाड्या सुरू केलेल्या आहेत. मात्र सोलापूर स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या आजदेखील बंद असल्याने पुणे, मुंबईकडे अन्य वाहनांनी जावे लागत आहे.
- योगेश साखरे,
प्रवासी
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.