Mask
Mask

दिवाळीपूर्वी होईल माळशिरस तालुका कोरोनामुक्त ! अर्जुनसिंह मोहिते-पाटलांचा विश्‍वास 

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाळलेला जनता कर्फ्यू व तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तालुक्‍यातील कोरोनाचा वेग मंदावला आहे. नागरिकांनी अशीच साथ दिली तर तालुका दिवाळीपूर्वी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. 

माळशिरस पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्‍यातील आरोग्य विभागाचा व कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सभापती शोभा साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते आदी उपस्थित होते. 
मोहिते-पाटील म्हणाले, माळशिरस तालुक्‍यात 23 मार्चला लॉकडाउन सुरू झाला. या काळात सुरवातीला पुणे, सातारा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली होती. शहरातून एकही नागरिक तालुक्‍यात येऊ नये म्हणून खबरदारी घेतली. याकामी पंचायत समितीची आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले. राज्यातील व देशातील लॉकडाउन उठल्यानंतर तालुक्‍यात पुणे, मुंबई आदी शहरांतून नागरिक आले आणि तेथून तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. तालुक्‍यात महाळुंग, आनंदनगर, नातेपुते, वेळापूर व माळशिरस येथील कोव्हिड रुग्णांसाठी यंत्रणा उभारण्यात आली. त्याचप्रमाणे अकलूज येथे खासगी व माळशिरस येथे शासकीय कोव्हिड हॉस्पिटल सुरू केले. तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळून सहकार्य केले, त्यामुळे तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला. असे असले तरी धोका टळलेला नाही. जोपर्यंत या रोगावर लस येत नाही तोपर्यंत नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. 

डॉ. मोहिते म्हणाले, माळशिरस तालुक्‍यात आजअखेर 4633 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 3819 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. 650 रुग्णांवर उपचार सुरू असून 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

गटविकास अधिकारी स्मिता पाटील म्हणाल्या, पाच लाख लोकसंख्या असलेल्या माळशिरस तालुक्‍यातील 12 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 76 उपकेंद्रे, 23 डॉक्‍टर्स, 150 आरोग्य कर्मचारी, 395 आशा सेवक व ग्रामसेवक यांनी रुग्णांचा शोध घेण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर जाऊन 20 हजार 170 नागरिकांची रॅपिड टेस्ट व 8 हजार 997 नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी केली. तालुक्‍यात अकलूज, यशवंतनगर, संग्रामनगर व माळीनगर हे कोरोनाचे हॉटस्पॉट होते. तेथेही आरोग्य यंत्रणेने चांगले काम केले, त्यामुळे तालुक्‍याचा मृत्यूदर जिल्ह्यात सर्वात कमी 1.97 टक्के इतका राहिला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com