सरकारने परवानगी दिल्यास महाविद्यालय सुरू करणार : शिवशरण खेडगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या सी. बी. खेडगी महाविद्यालयाने सुरक्षित वातावरणात शिक्षण देण्याची योजना आखल्याचे सांगून सरकारने परवानगी दिल्यास महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शिवशरण खेडगी व प्राचार्य डॉ. के. व्ही. झिपरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

अक्कलकोट (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या सी. बी. खेडगी महाविद्यालयाने सुरक्षित वातावरणात शिक्षण देण्याची योजना आखल्याचे सांगून सरकारने परवानगी दिल्यास महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शिवशरण खेडगी व प्राचार्य डॉ. के. व्ही. झिपरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
सी. बी. खेडगी महाविद्यालय 1970 मध्ये स्थापन झाले. सध्या येथे के. जी. टू पी. जी. शिक्षण देण्याची व्यवस्था आहे. कोरोना संसर्ग काळात महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया व अध्ययन- अध्यापन प्रक्रिया काही काळ थांबलेली होती. परंतु आवश्‍यक काळजी घेऊन, सुरक्षा बाबींची पूर्तता करून महाविद्यालय सुरू करण्याची विशेष परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी महाविद्यालयाने केली आहे. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेशची सुविधासुद्धा सुरू करण्यात आल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी महाविद्यालयाने प्रवेशद्वारात सॅनिटायझर टनेलची उभारणी, महाविद्यालयात प्रवेश करताना व शिक्षण घेताना सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी, कार्यालय, बैठक हॉल, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगण, बगीचा, वस्तू भांडार, वर्गखोल्या, संगणक कक्ष या सर्व ठिकाणी संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसंदर्भात या सर्व बाबींवर नियंत्रण म्हणून महाविद्यालय परिसरात सर्वत्र सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवण्यात आले आहेत. थांबलेले शिक्षण गतिमान करण्यासाठी एक आदर्श पॅटर्नचा डेमो व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे सरकारकडे मांडणार असल्याचे प्राचार्य डॉ. झिपरे यांनी सांगितले. लॉकडाउन काळात बारावीचे ऑनलाइन वर्ग घेण्यात आल्याची माहिती उपप्राचार्य दत्तात्रय फुलारी व पर्यवेक्षिका व्ही. एन. वैद्य यांनी दिली. या पत्रकार परिषदेस प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. किशोर थोरे, प्रा. रूपनर व प्रा. आनंद गंदगे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If government gives permission college will be started