वीज गेल्यास द्या मिस कॉल 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

ही सोय पूर्वीप्रमाणे कायम 
मिस्ड कॉल किंवा "एसएमएस' या दोन्ही नव्या सुविधांसह महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ऍप तसेच 24X7 सुरु असलेल्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्याची सोय पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील असेही महावितरणने म्हटले आहे. 

सोलापूर ः अचानक वीज गेल्याने हैराण होणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांना महावितरणने दिलासा दिला आहे. आता ज्या भागातील वीज गेली आहे, त्या भागातील नागरिक महावितरणला "मिस कॉल' देऊन तक्रार नोंदवू शकतात. त्याचबरोबर "एसएमएस' करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन आहे. त्यामुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविता यावी, यासाठी सोपी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले होते. त्यानुसार ही सुविधा आजपासून महावितरणच्या वीजग्राहकांसाठी राज्यभरात सुरू होत आहे. 

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीज ग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्‍यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल द्यावा लागेल. मोबाईलवरून आलेल्या मिस्ड कॉलच्या आधारे ग्राहकांच्या वैयक्तिक लेजरवरून (कन्झुमर पर्सनल लेजर) संगणक प्रणालीद्वारे ग्राहक क्रमांकाचा शोध घेतला जाईल व तक्रार प्राप्त झाल्याचा एसएमएस संबंधित ग्राहकांना पाठविला जाईल. एकापेक्षा अधिक ग्राहक क्रमांकासाठी एकाच मोबाईल क्रमांकाची नोंदणी असल्यास संबंधित मोबाईल क्रमांकावरील पहिल्या ग्राहक क्रमांकाबाबत तक्रार नोंदविण्यात येईल. 

मिस्ड कॉल किंवा अन्य "एसएमएस' सेवांसाठी ज्या वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत अद्यापही स्वतःच्या मोबाईल क्रमांकांची महावितरणकडे नोंदणी केलेली नाही, अशा ग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG हा एसएमएस 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची 24 तासांमध्ये महावितरणकडे नोंदणी केली जाईल. 

"एसएमएस'द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी आवश्‍यक नाही. कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून "एसएमएस'द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र 12 अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्‍यक आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून NOPOWER हा "एसएमएस' महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसा एसएमएस वीजग्राहकांना पाठविण्यात येईल. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the power goes out, give miss call