ठाकरे-पवार-राऊतांनी ठरविल्यास वीज बिलावर दहा मिनिटा निर्णय शक्‍य, विरोधी पक्षनेते दरेकर : मुंबई महापालिका स्वबळावरच लढण्याचा प्रयत्न 

प्रमोद बोडके
Friday, 20 November 2020

विरोधी पक्षनेते दरेकर म्हणाले, राष्ट्रवादी आणि शिवसेना कॉंग्रेसची अडवणूक करीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची फरफट होत असली तरीही कॉंग्रेसवाले धाडसी निर्णय घेत नाहीत. सरकारवर दबावही आणत नाहीत व सरकारमधून बाहेरही पडत नाहीत. यात जनतेची फरफट होत आहे. याकडे मात्र तिन्ही पक्षांचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत आहे.

सोलापूर : लॉकडाऊन कालावधीत वीज ग्राहकांना पाठविलेली वीजबिले कशी योग्य आहेत ते पटवण्यासाठी सरकारने मेळावे घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 100 युनिट मोफत वीज देऊ म्हणणाऱ्यांनी आता यू टर्न घेतला आहे. वीजबिलात सवलत तर नाहीच परंतु त्यांच्या जखमेवर सरकार मीठ चोळत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत या तिघांनी एकत्रित बसून वीज बिलप्रश्नावर चर्चा केल्यास दहा मिनिटात निर्णय घेता येईल परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघातील भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ ते सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेस खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी हे आमदार, महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शशी थोरात उपस्थित होते. 

वीजबिलप्रश्नावर भाजपच्यावतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनात मनसे, वंचित, स्वाभिमानी संघटना सहभागी होणार आहेत. याचा अर्थ ते निवडणुकीत आमच्यासोबत येतील असे नाही. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक आम्ही स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करणार आहोत. निवडणुकीवेळी पक्ष योग्य तो निर्णय घेईल अशी माहितीही दरेकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Thackeray-Pawar-Raut decides, 10 minutes decision on electricity bill is possible, Leader of Opposition Darekar: Mumbai Municipal Corporation tries to fight on its own