esakal | सोलापूर जिल्ह्यात असा होतोय वाळू उपसा 
sakal

बोलून बातमी शोधा

Illegal sand traffic in Solapur district

आंबे (ता. पंढरपूर) शिवारातील भीमा नदीपात्रालगत असलेल्या आंबे ते चळे रस्त्यानजीक दत्तात्रय गायकवाड (रा. चळे) यांच्या शेताजवळ भीमा नदीपात्रातून ट्रॅक्‍टर व यारीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सोलापूर जिल्ह्यात असा होतोय वाळू उपसा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : आंबे व चळे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात आज पोलिसांनी कारवाई केली. कारवाईदरम्यान 24 ब्रास वाळूसह पाच लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आंबे व चळे येथील सात जणांविरोधात अवैध वाळू चोरीप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी बापूसाहेब मोरे यांनी फिर्याद दिली. 
आंबे (ता. पंढरपूर) शिवारातील भीमा नदीपात्रालगत असलेल्या आंबे ते चळे रस्त्यानजीक दत्तात्रय गायकवाड (रा. चळे) यांच्या शेताजवळ भीमा नदीपात्रातून ट्रॅक्‍टर व यारीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी पोलिसांनी दत्तात्रय गायकवाड यांच्या शेताजवळील भीमा नदीपात्रात पाहणी केली असता एका विना क्रमांकाच्या स्वराज्य ट्रॅक्‍टरला यारी जोडून वाळू उपसा केला जात असल्याचे दिसून आले. कारवाईसाठी पोलिस आल्याचे कळताच वाळू उपसा करणारे अनोळखी सहा जण पळून गेले. 
कारवाईदरम्यान दत्तात्रय सुदाम गायकवाड, विठ्ठल यशवंत गायकवाड, यशवंत चौगुले यांच्या शेतात प्रत्येकी 40 हजार रुपयांची आठ ब्रास वाळूसह 60 हजार रुपयांची लोखंडी यारी सापडली. कारवाईदरम्यान सिधू नागणे (रा. आंबे), बापूराव मनोहर जाधव (आंबे), संजय चौगुले (रा. पंढरपूर), अनिकेत कांबळे (रा. आंबे) यांच्या शेतातही अवैध वाळू आणि यारीचे साहित्य आढळून आले म्हणून या संशयित आरोपींविरोधात अवैध वाळू उपसा करून पर्यावरणाचा ऱ्हास केला म्हणून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.