दोन वेळच्या जेवणाची भ्रांत.. तिथं ऑनलाइन शिक्षण कुठं देता...  मोहोळ तालुक्‍यातील पारधी समाजाची व्यथा : भारतमाता प्रतिष्ठानचे मदतीसाठी आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

मोहोळ येथील एका पारधी युवकाने आपला समाज सुधारावा व गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावा, यासाठी त्याच्या संस्थेमार्फत जिल्ह्यात पाच ठिकाणी पालावरच्या शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, सध्या या विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाची व अंगावरच्या कपड्यांचीही भ्रांत आहे. समाजाने संस्थेकरीत मदत करावी, अशी अपेक्षा पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले यांनी व्यक्त केली आहे. 

 

मोहोळ : पारधी म्हटले की, डोळ्यासमोर येतो शिकारीची साधने घेऊन गायीवर बसून रानावनात भटकणारा आदिवासी. ब्रिटिशकाळापासून गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर बसल्याने ना गावात घर आहे. ना शिवारात शेत. अशा अवस्थेत जीवन जगणाऱ्या पारधी समाजातील मुलांसमोर सध्या दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. तिथं ऑनलाइन शिक्षण कुठून मिळणार? 
मोहोळ येथील एका पारधी युवकाने आपला समाज सुधारावा व गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावा, यासाठी त्याच्या संस्थेमार्फत जिल्ह्यात पाच ठिकाणी पालावरच्या शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, सध्या या विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाची व अंगावरच्या कपड्यांचीही भ्रांत आहे. समाजाने संस्थेकरीत मदत करावी, अशी अपेक्षा पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले यांनी व्यक्त केली आहे. 
भारतमाता आदिवासी पारधी समाज व भटके-विमुक्त प्रतिष्ठान या संस्थेमार्फत मोहोळ येथे पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. समाजातील दानशुर व्यक्तींच्या मदतीने त्यांच्या राहण्याची तसेच जेवण्याची व्यवस्था गेल्या पंधरा वर्षापासून केली जात आहे. कुठलेही शासकीय अनुदान अद्यापपर्यंत या संस्थेला मिळालेले नाही. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या 70 टक्के मुलांना आईवडिलच नाहीत तर साधारण 30 टक्के मुलांना आईवडिल आहेत,मात्र त्यांची वर्षानुवर्षे भेट होत नाही. 
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे विद्यार्थी सांभाळण्याचे ज्ञानेश्‍वर भोसले यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. अनेक विद्यार्थी सध्या रानामाळात भटकंती करीत आहेत. सध्या सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. संस्थेने मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळावे, यासाठी संगणक कर्जरूपाने घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना जिथ जेवण्याची भ्रांत आहे त्या ठिकाणी मोबाईल कुठून येणार. त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून हे विद्यार्थी आज तरी दूरच आहेत. ही लहानगी मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत, म्हणून त्यांना सातत्याने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा भोसले यांचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी पालावरच्या शाळा सुरू केल्या आहेत. त्या त्या ठिकाणच्या दानशूरांनी या अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन भोसले यांनी केले आहे. 

शाळेचे ठिकाण व विद्यार्थी संख्या 
 

  • यल्लमवाडी -45 विद्यार्थी 
  • कुर्डु - 32 विद्यार्थी 
  • पुळुज -26 विद्यार्थी 
  • धायटी -72 विद्यार्थी 
  • मुख्य शाळा मोहोळ -120 
  •  
    संपादन : अरविंद मोटे 
     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The illusion of a two-course meal .. where do you give online education ..