परबत-पाटील कुटुंबीयांचे पर्यावरणप्रेम ! वडिलांच्या अस्थींचे केले झाडांच्या बुडामध्ये विसर्जन 

संतोष पाटील 
Wednesday, 2 December 2020

पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी पोचू नये म्हणून मृत वडिलांवर अग्निसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची रक्षा व अस्थींचे नदी व विहिरीतील पाण्यात विर्सजन न करता माढा तालुक्‍यातील अकोले बुद्रूक येथील परबत-पाटील कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतामध्ये पाच फळझाडे लावून या झाडांच्या बुडामध्ये वडिलांची रक्षा व अस्थींचे विर्सजन केले. 

टेंभुर्णी (सोलापूर) : पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी पोचू नये म्हणून मृत वडिलांवर अग्निसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची रक्षा व अस्थींचे नदी व विहिरीतील पाण्यात विर्सजन न करता माढा तालुक्‍यातील अकोले बुद्रूक येथील परबत - पाटील कुटुंबीयांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतामध्ये पाच फळझाडे लावून या झाडांच्या बुडामध्ये वडिलांची रक्षा व अस्थींचे विर्सजन केले. परबत- पाटील कुटुंबीयांनी पर्यावरणाला जुन्या रूढी व परंपरांना फाटा देत नवीन पायंडा पाडल्याने पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

माढा तालुक्‍यातील अकोले बुद्रूकचे माजी सरपंच शत्रुघ्न सुबराव परबत - पाटील (वय 85) यांचे रविवारी निधन झाले. शत्रुघ्न पाटील यांनी अकोले बुद्रूकचे अनेक वर्षे सरपंचपद भूषविले होते. या गावच्या विकासामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले. मंगळवारी (ता. 1) (कै.) शत्रुघ्न परबत - पाटील यांचा तिसऱ्याचा विधी होता. या दिवशी त्यांची रक्षा व अस्थी (हाडे) नदी किंवा विहिरीतील पाण्यात न टाकता त्यांच्या पत्नी केशरबाई परबत - पाटील, मुलगी मंदाकिनी भीमराव शेळके व त्यांचा मुलगा, माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर परबत - पाटील यांनी त्यांच्या शेतात पाच फळझाडे लावून त्याच्या बुडाला अस्थी व राखेचे विसर्जन केले. 

मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याची रक्षा व अस्थी नदी किंवा विहिरीतील पाण्यात विसर्जित केले जातात. यामुळे पाणी दूषित बनते व पर्यावरणाला हानी पोचू शकते. ही जुनी पद्धत बंद करून पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून आम्ही परबत- पाटील कुटुंबीयांनी रक्षा विसर्जनाची नवीन वेगळी पद्धत सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या शेतात आमच्या वडिलांच्या अस्थी व रक्षा यांचे बेल, सीताफळ, पेरू, आंबा व चिंच या पाच झाडांचे वृक्षारोपण करून त्यांच्या बुडात विसर्जन केले आहे. यामुळे भविष्यकाळात या झाडांपासून ऑक्‍सिजन मिळेल व भावी पिढीला फळेही मिळतील. अस्थींचे पाण्यात विसर्जनाची जुनी परंपरा मोडून, पर्यावरण दूषित होऊ नये म्हणून यापुढे आम्ही अशाच प्रकारे मृत व्यक्तींच्या रक्षा व अस्थींचे विर्सजन करणार आहोत व त्याचा प्रचारही करणार आहोत. तसेच लोकांमध्ये याविषयी जनजागृतीही करणार आहोत. 
- प्रभाकर परबत-पाटील, 
अकोले बुद्रूक, ता. माढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immersion of dead fathers bones in trees by Parbat-Patil family