कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मंगळवेढा शहराबाबत महत्त्वाचा निर्णय 

हुकुम मुलाणी 
Sunday, 6 September 2020

मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव म्हणाले, की नगरपालिकेच्या सभागृहात शहरातील व्यापाऱ्यांच्या बैठकीतून अर्धवेळ बंदबाबत निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केले जातील. नागरिकांनी देखील या प्रयत्नाला सहकार्य करावे.

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यामध्ये कोरानाचे रूग्ण वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले. अशा परिस्थितीत वाढत चाललेली साखळी रोखण्यासाठी नगरपरिषद व व्यापारी असोसिएशनच्या वतीने शहर व दोन ग्रामपंचायतीचा परिसर उद्यापासून (सोमवार) अर्धवेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 
नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये सकाळी 9 ते दुपारी दोनपर्यत दुकाने सुरू ठेवण्याचा व आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरू राहतील. तालुक्‍यामध्ये सध्या रुग्ण संख्येने पाचशेचा आकडा पार केला. पालकमंत्र्याच्या आढावा बैठकीमध्ये ही साखळी रोखण्याच्या दृष्टीने जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले. तपासणीसाठी नागरिकांनी पुढे यावे व तपासणी कॅम्प लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार चाचणीची प्रक्रिया सध्या शहर व ग्रामीण भागात सुरू आहे. काही गावात लोक पुढे येईनात म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून भिती दूर करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली. वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण पसरू लागले. त्यामुळे वाढत चाललेली साखळी रोखण्याच्या दृष्टीने पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊन करण्याबाबतचे वृत्त आज ई सकाळ'ने सकाळीच प्रसिद्ध केले. त्यादृष्टीने व्यापारी व प्रशासनाने हा सकारात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
चोखामेळा नगरचे उपसरपंच म्हणाले, की कोरानाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने मास्क नसणाऱ्यांना पाचशे रुपये व गर्दी जमवणाऱ्यास पाच हजार रुपये असा जादा रकमेचा दंड आकारून कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली तर कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An important decision regarding the mangalvedha city as corona infection continues to grow