डिझेल दरवाढीमुळे शेती मशागतीच्या दरातही मोठी वाढ ! वाचा काय सुरू आहेत सध्याचे दर

Tractor
Tractor

केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात रब्बी हंगामातील पिके निघतील तसे आगामी पिकांसाठी शेतजमीन तयार करण्यासाठी शेतकरी राजा शेतातील मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे. पारंपरिक बैलांच्या साह्याने होणारी शेती मशागतीची कामे मात्र सध्या आधुनिक यांत्रिकीकरणाच्या काळात ट्रॅक्‍टरच्या साह्याने केली जात असल्याने बैलांची जागा ट्रॅक्‍टरने घेतली आहे. मात्र वरचेवर इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्‍टरने शेतीची मशागत करताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. 

उन्हाळी भुईमूग, कांदा याबरोबरच चवळी, मूग, मका, कापूस आदी पिकांच्या पेरणी करण्यासाठी त्याअगोदर शेती मशागत म्हणून शेतीची नांगरणी, वाफे तयार करणे आदी कामांना सुरवात झाली आहे. तर गाळपासाठी गेलेल्या खोडवा उसाच्या सरी फोडणे, चाळणी करणे, औषध फवारणी, खुरपणीची कामे सुरू झाली आहेत. 

शेतीच्या कामासाठी 12 महिने बैलांचे संगोपन करणे खर्चिक होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी छोटे ट्रॅक्‍टर खरेदी करून स्वतःच्या शेतीबरोबरच इतरही शेतकऱ्यांच्या शेतीची मशागत ट्रॅक्‍टरद्वारे करत असले तरी वरचेवर इंधन दरात होणाऱ्या वाढीमुळे ट्रॅक्‍टरने शेती मशागतीची कामे करणेही वरचेवर डोईजड होत आहे. 

डिझेल दरवाढीमुळे मशागतीच्या दरात वाढ ! 
मागील काही दिवसांपासून रोजच डिझेलचे दर वरचेवर वाढत आहेत. त्यामुळे याचा फटका सर्वांनाच बसू लागला आहे. दर वाढल्याने अगोदरच निसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. 

एक तर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य दर मिळत नाही, त्यातच वारंवार बदलणाऱ्या हवामानाचे संकट असल्याने औषध फवारणीचा खर्चही वाढतोय. शेतीच्या मजुरीसह सर्व खर्च वरचेवर वाढतच आहेत. डिझेलचे दर 90 रुपये लिटरवर गेल्याने या संकटात भर पडत आहे. 

पूर्वीच्या काळी बैलांच्या साह्याने मशागतीची कामे केली जात होती. परंतु आधुनिक काळात वरचेवर यांत्रिकीकरण होत असल्याने ट्रॅक्‍टरच्या साह्याने केली जात आहे. मात्र डिझेल दरवाढीमुळे काही शेतात बैलांच्या साह्याने मशागत केल्याचे दिसून येत आहे. बैलजोडीच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत व वर्षभर बैलांना सांभाळणेही जिकिरीचे जात आहे. त्यामुळे कृषिप्रधान देशात शेती कशी करायची, हाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. 

ट्रॅक्‍टरने शेती मशागतीचे दर : सध्याचे दर व कंसात डिझेल दरवाढीपूर्वीचे दर

  • छोटा ट्रॅक्‍टर : 450 रुपये तास (550 रुपये) 
  • एक एकर : 1600 रुपये (1300 रुपये) 
  • मोठा ट्रॅक्‍टर : 750 रुपये तास (550 रुपये) 
  • एक एकर नांगरणी : 3000 रुपये (2200 रुपये) 
  • रोटर : 2000 रुपये (1500 रुपये) 
  • सरासरी शेतीच्या सर्व मशागतीच्या दरात 500 रुपयांनी वाढ झाली आहे. 

डिझेल इंधनाच्या दरात रोजच वाढ होत असल्याने नाइलाजाने शेती मशागतीच्या दरातही वाढ करावी लागत आहे. वाढलेल्या दराशिवाय शेती मशागत करणे परवडत नाही. 
- गणेश ढवळे, 
ट्रॅक्‍टर मालक, केत्तूर 

शेती मशागतीचे दर वाढले असले तरी मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. काही कामे मात्र उधारीवर करावी लागत आहेत. 
- हरी खाटमोडे, 
ट्रॅक्‍टर मालक, केत्तूर 

शेती मशागतीबरोबरच मजुरीचे दरही वरचेवर वाढत आहेत. त्या मानाने शेतीतून उत्पन्न मात्र मिळत नाही. सध्या शेती करणे म्हणजे आतबट्ट्याचा खेळ झाला आहे. 
- बाबा बाबर, 
शेतकरी, हिंगणी 

वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे शेती उद्योग संकटात आला आहे. त्यातच शेती मशागतीचे दर वाढल्याने संकटात भरच पडली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेती करावी की नाही, हाच प्रश्न सतावत आहे. 
- श्रीकांत साखरे, 
शेतकरी, राजुरी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com