उदंड झाल्या भाज्या ! ग्रामीण भागात एकाच वेळी उत्पादन; भाव मात्र गडगडले 

कुलभूषण विभूते 
Wednesday, 6 January 2021

बार्शी तालुक्‍यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाल्यांची शेती केली जाते. तालुक्‍यातील पालेभाज्यांना नवी मुंबई, पुणे मार्केट यार्ड, लातूर, सोलापूर, बार्शी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर मिळतो. त्यामुळे रोज तालुक्‍यातून लाखो जुडी पालेभाज्यांची निर्यात होते. 

वैराग (सोलापूर) : ग्रामीण भागात एकाच वेळी भाज्यांचे उत्पादन वाढल्याने भावांत मोठी घसरण झाली आहे. पालक, मेथी, चुका, शेपू, चाकवत आदी भाज्यांना प्रति पेंढी तीन - चार रुपयांचा दर मिळू लागल्याने उदंड झाल्या पालेभाज्या म्हणण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. 

बार्शी तालुक्‍यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाल्यांची शेती केली जाते. तालुक्‍यातील पालेभाज्यांना नवी मुंबई, पुणे मार्केट यार्ड, लातूर, सोलापूर, बार्शी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर मिळतो. त्यामुळे रोज तालुक्‍यातून लाखो जुडी पालेभाज्यांची निर्यात होते. याशिवाय तालुक्‍यात बार्शी, वैराग, गौडगाव, शेळगाव (आर), भातंबरे, मालवंडी, उपळाई (ठोंगे), उपळे दुमाला आदी ठिकाणच्या बाजारात मेथी, चुका, पालक, शेपू, चाकवत, पाथर, राजगिरा, करडी, पुदिना, कडिपत्ता आदी भाज्यांचे एकाच वेळी उत्पादन होऊन बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाज्या कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. 

घाऊक बाजारात कोथिंबीर दीड रुपया, मेथी तीन रुपये, कांदापात दोन रुपये, करडई दोन रुपये, पुदिना एक रुपया, राजगिरा दोन रुपये, चुका एक रुपया, शेपू एक रुपया, अंबाडी दोन रुपये असा दर मिळत असल्याचे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले. रोज ताज्या - स्वच्छ व स्वस्त पालेभाज्या मिळत असल्याने खरेदीदारांच्या पिशव्या गच्च भरलेल्या दिसत आहेत. खरेदीदार व ग्राहक मात्र शेतकऱ्यांना उदंड झाल्या भाज्या म्हणून सांगत "नको जास्त भाज्या, भरल्या आमच्या पिशव्या' म्हणून नाकारत आहेत. तर भाजी उत्पादक शेतकरी मात्र भाज्यांच्या गाठोडेंचे ओझे वाहताना त्रासलेले दिसत आहेत. 

शहराबरोबर आता ग्रामीण भागात भाज्यांच्या विक्रमी उत्पादनाने भावात मोठी घसरण झाली आहे. यात शेतकऱ्याचे आर्थिक मरण होत असल्याचे खरेदीदार व्यापारी वैराग आयुब बागवान यांनी सांगितले. 

पालेभाज्या पिकवल्या, मात्र उत्पादन वाढले. दराची घसरण झाली. मातीमोल दराने भाज्या विक्री कराव्या लागत आहेत, असे सारोळे (ता. बार्शी) येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी भारत कुराडे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the increase in production the prices of leafy vegetables have come down drastically