पुणे शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसने उमेदवार दिल्याने विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत अडचणीत 

 Dattatray Sawant
Dattatray Sawant

पंढरपूर (सोलापूर) : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत या वेळी मोठी चुरस पहायाला मिळणार आहे. या निवडणुकीत थेट महाविकास आघाडी आणि भाजप आमने - सामने येणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ कॉंग्रेसला तर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे. कॉंग्रेसने जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून सोलापूर येथील जितेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. 

कॉंग्रेस आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने विद्यामान आमदार दत्तात्रय सावंत यांची कोंडी झाली आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेने राज्यातील पाचही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 

पुणे मतदारसंघातील दोन्ही जागा ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधला आहे. 2014 साली झालेल्या पुणे शिक्षक मतदारसंघातून अपक्ष असलेले उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी विद्यमान आमदार भगवानराव साळुंखे यांचा धक्कादायक पराभव केला होता. तर दुसरीकडे पदवीधर मतदारसंघात मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला होता. 

गेल्या सहा वर्षांमध्ये या दोन्ही मतदारसंघांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. तर भाजपनेही राजकीय मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. पदवीधर बरोबरच शिक्षक मतदारसंघात चमत्कार घडविण्याच्या दृष्टीने भाजपचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. पक्षीय राजकारणाच्या साठमारीत अपक्ष उमेदवार आमदार दत्तात्रय सावंत हे कशी लढत देणार, याकडेच लक्ष लागले आहे. 

कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून ते काम करत आहेत. पुणे विभागातील अनेक शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांचा त्यांचा थेट संपर्क आहे. पुणे विभागात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारीमुळे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत अडचणीत येण्याची शक्‍यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 

आमदार दत्तात्रय सावंत यांचा गाठीभेटीवर जोर 
विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी मागील दोन महिन्यांपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यांनी आतापर्यंत गाठीभेटीची पहिली फेरी पूर्ण केली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती पुन्हा शिक्षक देतील, असा विश्वास आमदार सावंत समर्थकांनी व्यक्त केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com