
बोरामणी विमानतळासाठी आवश्यक 29 हेक्टर जमिनीचे संपादन युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 19) 20 पैकी आठ शेतकऱ्यांकडून खरेदीखत करून त्यांना दहा कोटी रुपये देण्यात आले.
सोलापूर : बोरामणी विमानतळासाठी आवश्यक 29 हेक्टर जमिनीचे संपादन युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 19) 20 पैकी आठ शेतकऱ्यांकडून खरेदीखत करून त्यांना दहा कोटी रुपये देण्यात आले.
होटगी रोडवरील विमानतळाचा समावेश केंद्र सरकारच्या उडान योजनेत करण्यात आला. मात्र, अडथळ्यांची शर्यत पार करण्यात अद्याप यश आलेले नाही. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यासह विविध प्रकारचे अडथळे निर्माण झाल्याने या विमानतळावरून ही योजना सुरू झालेली नाही. दरम्यान, आता होटगी विमानतळाबरोबरच बोरामणी विमानतळाचा विकास करण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू झाले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बोरामणी विमानतळाच्या पुढील विकासकामांसाठी शासनाकडून निधी मागितला जाणार आहे. त्यात केंद्र सरकार व राज्य सरकारचा 50-50 टक्के निधी असणार आहे, असे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील दोन वर्षांत विमानतळाचा विकास करून सुरू करण्याचे नियोजन केले जात असल्याचेही सांगण्यात आले.
ठळक बाबी...
20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल भूसंपादन प्रक्रिया
बोरामणी विमानतळासाठी आवश्यक 29 हेक्टर जमिनीचे संपादन करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली आहे. एकूण 20 शेतकऱ्यांपैकी आठ शेतकऱ्यांकडील जमिनीची खरेदी काल (मंगळवारी) झाली आहे. आता 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण होईल. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचवालक दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली गतीने काम सुरू आहे.
- दीपक नलावडे,
अप्पर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मुंबई
संपादन : श्रीनिवास दुध्याल