कुरनूर धरणावर पक्षी धाम अन्‌ निरीक्षण केंद्रासाठी प्रयत्न; "सकाळ'चा पुढाकार, डॉ. मेतन फाउंडेशनचे सहकार्य (Video)

Kurnur Dam.
Kurnur Dam.

अक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील नैसर्गिकरीत्या सुंदर असलेल्या बोरी धरण परिसरात राष्ट्रीय पक्षी धाम तसेच पक्षी निरीक्षण केंद्र होणे गरजेचे आहे. याचे महत्त्व ओळखून "सकाळ'ने यासाठी पुढाकार घेतला आहे. सोलापूरच्या डॉ. मेतन फाउंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन हे यासाठी एक अहवाल तयार करीत आहेत. लवकरच पुढील कार्यवाहीसाठी शासन स्तरावर हा प्रकल्प पाठविला जाणार आहे. याचा योग्य पाठपुरावा होऊन जर हा सुंदर प्रकल्प मार्गी लागला, तर अक्कलकोट तालुक्‍यात धार्मिक पर्यटनाबरोबरच हे पक्षी निरीक्षण केंद्रसुद्धा महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून पुढे येईल, यात संदेह नाही. 

कुरनूर धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा खऱ्या अर्थाने पक्षी वन्यजीव यांचं नंदनवन ठरत आहे. मागील अनेक वर्षांपासून अनेक पक्षीप्रेमी या धरण परिसरात पक्षी आणि वन्यजीवांचे निरीक्षण करीत असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षी आणि वन्यजीव आनंदानं नांदताना दिसत असतात, सोलापूरकरांना ही अभिमानाची गोष्ट आहे. या परिसरात दरवर्षी अनेक परदेशी पक्षी स्थलांतर करीत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने कैकर, पट्टकदंब, नॉर्दन पिंटेल, टील, रेड हेडेड पोचर्ड, रुडी शेलडक, कोम्बडक अशा अनेक पक्ष्यांचा समावेश होतो. 

वर्षभर या नदीच्या पात्रात आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक जातींचे पक्षी आणि प्राणी आनंदाने राहत असताना आढळतात. यामध्ये प्रामुख्याने स्पोट बिल्लेड डक, स्पून बिल्स, पेंटेड स्टॉर्क, व्हाइट नेकड रिवर टर्न, हेरोंस, किंगफिशर, मूरहेन आदींसह 140 ते 150 विविध प्रकारच्या पक्ष्यांचा समावेश होतो. हे धरण खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्याला एक देणगी असून या परिसरातील वन्यजीवांचे रक्षण-संरक्षण करून एक उत्तम पक्षी निरीक्षण केंद्र आणि पर्यटन स्थळ व्हावे, अशी पक्षी पर्यटकांची मनापासून इच्छा आहे. यामुळे धरण परिसरात भेट देऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी, मेतन फाउंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन, विमानतळ प्राधिकरणाचे सज्जन निचळ, सेवानिवृत्त अभियंता प्रल्हाद कांबळे, "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, रियाज पटेल, नागनाथ उदंडे, प्रा. अमोगसिद्ध चेंडके आदींनी पाहणी केली. 


परदेशी पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास 
कुरनूर धरण परिसरात हिवाळ्याच्या मोसमात तीन ते चार महिने युरोप व सायबेरिया या भागातून सुमारे तीन हजार मैलांचे अंतर कापून मुबलक प्रमाणात या ठिकाणी पक्षी वास्तव्यास येत असतात. कारण हा परिसर नैसर्गिकरीत्या अतिशय सुंदर असून पक्षी वर्गास सुरक्षित अशी जागा आहे. आणि त्यांना या धरण किनारी असलेल्या पाण्याने हिरवळ (अल्गी) तसेच झुडुपांत राहणारे छोटे पक्षी तसेच मासे आदी अन्न त्यांना मुबलक प्रमाणात मिळते. म्हणून या ठिकाणी परदेशी पक्षी वर्गाचे वास्तव्य मोठे असते आणि इथले वेगवेगळे परदेशी पक्षी पाहिल्यास या ठिकाणी निश्‍चित राष्ट्रीय पक्षी निरीक्षण केंद्र होणे हिताचे ठरणार आहे. 

कुरनूर धरणात सतत पाणी आणि पक्षी खाद्य उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी 150 पेक्षा जास्त देश-विदेशातील पक्षी येत असतात. याचा योग्य लाभ उठवीत या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र झाल्यास पक्षीप्रेमी आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्यांची पर्यटन सोय होऊन त्यांच्या आनंदात भर पडणार आहे. 

याबाबत पक्षी निरीक्षक डॉ. व्यंकटेश मेतन म्हणतात, मेतन फाउंडेशनचे म्हणजे माझे एक स्वप्न आहे, की कुरनूर धरण परिसरात एक पक्षी धाम व राष्ट्रीय पक्षी निरीक्षण केंद्र व्हावे आणि त्यासाठी मी एक प्रकल्प तयार करीत आहे. त्याचा पाठपुरावा सतत करीत राहणार आहे. कुरनूर धरण परिसर हे नैसर्गिक वातावरणात असून या कामासाठी विशेष असे कोणतेही खर्च करावे लागणार नाही. सर्व लोकांचा यासाठी सकारात्मक सहभाग घेऊन याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला जाणार आहे. 

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, डॉ. व्यंकटेश मेतन यांनी या पक्षी निरीक्षण केंद्रासाठी जो पुढाकार घेतला आहे तो या परिसराचा कायापालट करण्यासाठी आणि विकासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पक्षी निरीक्षण केंद्र हे पर्यटकांना चांगली संधी उपलब्ध असणार आहे. हे केंद्र मंजूर होण्यासाठी माझ्यापरीने जे काही मदत किंवा सहकार्य लागेल ते मी करणार आहे. इथले पक्षी वास्तव्य हे अतिशय सुखद व आनंददायी आहे. 

चपळगावचे नागरिक रियाज पटेल म्हणाले, कुरनूर धरण परिसर हे अतिशय निसर्गरम्य परिसर असून या ठिकाणी शेकडो पक्षी येत असतात. यासाठी येथे पक्षी निरीक्षण केंद्र होणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. या परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्णत्वास जाणार आहे. 

अक्कलकोटचे पक्षी निरीक्षक समीर मनियार म्हणाले, मी गेल्या दहा वर्षांपासून अनेक ठिकाणी पक्षी निरीक्षण केले आहे, पण कुरनूर येथे येणारे पक्षी हे अनोखे आहेत. इथल्या परिसराची आणखी सुधारणा केल्यास सौंदर्य आणखी खुलेल आणि महाराष्ट्रभरातून पक्षी प्रेमी पर्यटनाचा आनंद घेतील आणि याचबरोबर या परिसराचा विकास देखील होण्यास मदत होणार आहे. कुरनूर धरण परिसरात मी अनेक वेळा छायाचित्रे काढण्याचा आनंद घेतला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com