अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळख असलेला माढा आता होणार ‘फुलांचे गाव’

The Inspire Foundation has decided to make Madha a flower village.jpg
The Inspire Foundation has decided to make Madha a flower village.jpg

माढा (सोलापूर ) : माढ्यातील इन्स्पायर फाउंडेशनच्या फुलांच्या गाव या उपक्रमाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमांतर्गत माढा शहरामध्ये विविध फुलांची एक हजार तीनशे झाडे लावण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या एक हजारांहून अधिक लोकांनी यासाठी नोंदणी केली असून दररोज नोंदणी करणार्‍यांची संख्या वाढतच आहे.

माढ्यातील इन्स्पायर फाउंडेशन मागील तीन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण चळवळीबरोबरच लोकांमध्ये पर्यावरण पूरक सवयी जागृत करण्याचे काम करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील चाळीसहून अधिक गावांमध्ये इन्स्पायर फाऊंडेशनचे स्वयंसेवक मागील तीन वर्षांपासून हे काम सनदी अधिकारी विपुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य करीत आहेत.
 
गावांची निवड करून गावातील लोकांचे गट तयार करतात. गावामध्ये लोकांची बैठक घेऊन व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे पर्यावरणाचे महत्व व पर्यावरण पूरक सवयी अंगी करण्यासाठी प्रबोधन करतात. शालेय विद्यार्थ्यांनाही स्वयंसेवक पर्यावरणविषयक मार्गदर्शन करतात. व्हाट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावरही मार्गदर्शन करतात. यानंतर त्या गावांमध्ये वृक्षारोपणाचे काम हाती घेतात. इन्स्पायर फाऊंडेशनच्या काम करण्याच्या या शास्त्रीय पद्धतीमुळे इन्स्पायर फाउंडेशन लावलेली बहुतांशी सर्वच झाडे लोक स्वतःहून जपण्यासाठी पुढे येतात. इन्स्पायर फाउंडेशनच्या या वृक्षारोपण व पर्यावरण विषयक प्रबोधनाच्या कार्यक्रमाशी समाजातील सर्व स्तरातील हजारो लोक जोडले गेलेले आहेत. 

माढा शहरांमध्ये इन्स्पायर फाउंडेशनने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. माढयाला फुलांचं गाव करण्यासाठी फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी पद्धतशीर नियोजन केले आहे. शहरांमध्ये बहावा (पिवळी फुले) २९०, नीलमोहर/जॅकरांडा(नीळीजांभळी फुले) २१७, बूचाची झाडं(पांढरी फुले) ३००, वसंतराणी/टबोबीया रोझीया (गुलाबी फुले) २०५, स्पॅथोडीया (गर्द नारंगी फुले) २००, पळस (लालकेशरी फुले) १०० अशी एकूण एक हजार तीनशे झाडे लावण्यात येत आहेत. 

या उपक्रमांतर्गत शहरातील एक हजार लोकांनी इन्स्पायर फाउंडेशनकडे नाव नोंदणी केली असून फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी नाव नोंदणी केलेल्या लोकांच्या घरी जाऊन झाडं लावण्याच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. सध्या फाऊंडेशनचे स्वयंसेवक लोकांच्या घरी जाऊन ही फुलांची झाडे लावत आहेत. 

झाडांचे फायदे, झाडे लावण्याची शास्त्रीय पद्धत, झाडे जगवण्यासाठी घ्यायची काळजी याबरोबरच वृक्षारोपणाच्या चळवळीतील सक्सेस स्टोरी लोकांसमोर मांडत आहेत.

माढयातील श्रीरामनगर, सन्मतीनगर, शुक्रवार पेठ, संतसेनानगर, राजरतननगर, शिवाजीनगर, इंदिरा गांधी झोपडपट्टी, यशवंतनगर, शिकलगार गल्ली या भागास शहरातील सर्वच भागातून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मागणी केल्यामुळे फुलांच्या झाडांची लागवड करण्याचे काम पन्नास टक्केपेक्षा अधिक झाले आहे. संपूर्ण माढा गाव हे फुलांचं गाव करण्याचा मानस इन्स्पायर फाउंडेशनचा आहे. 

मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने सकल मानवी समाजासमोर मोठ्या समस्या उभ्या राहत आहेत. झाडे तोडल्यामुळे आरोग्यविषयक समस्यांबरोबरच इतर आणखी समस्यांना मानवाला सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी लोकसहभागातून व जनजागृतीतेने मोठी चळवळ उभा करणं अपेक्षित आहे. लोकांच्या मनामध्ये झाड लावणे अर्थात लोकांच्या पर्यावरण विषयक सवयी सकारात्मक पद्धतीने वाढविल्यास लोक उस्फूर्तपणे वृक्षारोपणाच्या चळवळीत सहभाग घेऊन त्याचं जतनही करतील. या उद्देशाने इन्स्पायर फाउंडेशन वृक्षारोपण व लोकांचे प्रबोधन अशी दुहेरी भूमिका घेत ही चळवळ अधिक बळकट करण्याचे काम करत असून त्याला लोकांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे याला मोठ्या प्रमाणावर यश मिळत आहे. अशा चळवळी सर्वत्र उभ्या राहण्यासाठी इन्स्पायर फाऊंडेशनचे स्वयंसेवक सर्वांगाने मार्गदर्शन करण्यास सक्षम आहेत. 
- विपुल वाघमारे, सनदी अधिकारी

सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com